नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) तर्फे आयोजित निषेध सभेत मनुष्यबळ व्यवस्थापकांची एकजूट
पुणे– नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) तर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात मनुष्यबळ व्यवस्थापकांतर्फे एल्गार पुकारण्यात आला आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील झेड एफ स्टिअरिंग गिअर्स इंडिया लि. या कंपनीत उत्पादन व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अस्लम कोठाळी हे दिनांक २१ मार्च २०१८ रोजी बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कामावरून घराकडे परतत असताना त्यांना ५ ते ६ जणांनी बेदम मारहाण केली आणि रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. अशा घटनांना आळा बसावा या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) तर्फे बुधवारी दिनांक २८ मार्च २०१८ रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) च्या सुमंत मुळगावकर सभागृहात आयोजित निषेध सभेत औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात मनुष्यबळ व्यवस्थापकांतर्फे हा एल्गार पुकारण्यात आला .
यावेळी बोलताना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम)च्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले की एकीकडे संपूर्ण देशात पुणे जिल्ह्याची ओळख औद्योगिक विकासासाठी अग्रक्रमाने होत असताना दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारीमुळे मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या जीवितास धोका पोहोचत असेल तर अशा प्रसंगी पुण्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या सर्व मनुष्यबळ व्यवस्थापकांनी आपुलकी एकजूट दाखवून देण्याची वेळ आली आहे, तरच अशा दृष्टप्रवृत्तींना आळा बसू शकेल.
याप्रसंगी बोलताना झेड एफ स्टिअरिंग गिअर्स इंडिया लि चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिनेश मुनोत म्हणाले की,माझ्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत ही खूप धक्कादायक बाब आहे. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनानेही या घटनेच्या मुळाशी असलेल्याना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
यावेळी प्रसिद्ध कामगार कायदे तज्ञ् ऍड. राजीव जोशी यांनी सांगितले की, या घटनेशी संबंधित गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हायला हवी तसेच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करताना खुनाचे कलम लावून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अशी आग्रही भूमिका मांडली.
याप्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) चे महासंचालक अनंत सरदेशमुख, ‘ओ’एच.आर.चे प्रशांत इथापे, ऍड. आदित्य जोशी, व्हायब्रंट एच. आर. चे शंकर साळुंखे, भारत फोर्ज लि.चे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ. एस. व्ही. भावे, महिंद्रा व्हेईकल मॅनुफॅक्चरिंग प्रा. लि चे मनुष्यबळ व प्रशासन व्यवस्थापक महेश करंदीकर, आयएसटीडी चे योगेश उपाध्याय यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या घटनेच्या निषेधाचा ठराव व दोषींवर कठोर कारवाईची मागणी मांडण्याचा ठराव संमत करण्यात आला. निषेध सभेच्या सुरवातीला दिवंगत अस्लम कोठाळी यांच्याप्रति उपस्थितांनीं दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. या निषेध सभेसाठी पुणे पिंपरी चिंचवड, चाकण, रांजणगाव, हडपसर, नगर रोड आदी भागातील विविध कंपन्यांचे सुमारे ३०० हुन जास्त मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते.

