आम्ही लेखिका या संस्थेचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन
पुणे : आधुनिक जगामध्ये महिला छोट्याशा अपयशाने खचून जातात. हाती घेतलेले काम सोडून देतात आणि निराश होतात. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लेखन हे उपयोगी पडते. प्रत्येक महिलेने व्यक्त झाले पाहिजे आणि लिहिले पाहिजे अशी भावना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.
आम्ही लेखिका या संस्थेचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्या नलिनी पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा पाटील, केतकी देशपांडे, मृदुला कुलकर्णी, ममता मुंगेलवार, रेणुका पांचाळ, शिल्पा दिवाकर, उल्का मोकासदार, अर्चना नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मंगला गोडबोले म्हणाल्या, आपण जे जगतो तेच आपण लिहिले पाहिजे.आपण जे कधीच अनुभवले नाही ते लिहिण्याचा अट्टाहास करू नये कारण तसे लिखाण उघडे पडते. सोपे लिहिणे अवघड असते. आपण ज्या उमेदीने आणि उत्साहाने रोज नव्याने स्वयंपाक करतो त्याच प्रमाणे आपण नव्या उमेदीने लेखन केले पाहिजे.
नलिनी पाटील म्हणाल्या, महिलांना व्यक्त होण्याची संधी देऊन त्यांच्यातील लेखक बाहेर काढण्याचे काम ही संस्था करत आहे. महिला या लेखनाच्या माध्यमातून केवळ स्वतःचाच शोध घेत नाहीत तर त्या एका अर्थाने समाजालाही नवीन दिशा देत असतात. लेखन आणि वाचनातून केवळ साक्षरता घडत नाही तर एक समाज घडत असतो आणि यामध्येही महिला मागे नाहीत.
माधुरी जोशी. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाशन समारंभानंतर अभिवाचन आणि कविता सादरीकरण झाले. यामध्ये प्रभा सोनवणे, जागृती निखारे, शैलजा साळुंखे, शशिकला सुखाला, सुनीता शिंदे, अर्चना मवाळ, वृषाली वजरकर, केतकी देशपांडे यांसह अनेक लेखिका सहभागी झाल्या होताना.

