‘करिअर प्लॅनिंग आफ्टर टेन्थ अँड ट्वेल्थ’सविता मराठे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे – सविता मराठे यांनी लिहिलेल्या ‘करिअर प्लॅनिंग आफ्टर टेन्थ अँड ट्वेल्थ – ए टीन्स गाईड टु चूज द राईट पाथ’ या पुस्तकाचे प्रकाशन येथील ‘एनरुट करिअर ॲडव्हायजर’ संस्थेमध्ये ज्येष्ठ करिअर सल्लागार डॉ. श्रीराम गीत यांच्या हस्ते काल झाले. याप्रसंगी ‘श्यामची आई फाऊंडेशन’च्या संस्थापक विश्वस्त शीतल बापट, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञानावरील अनेक पुस्तकांचे लेखक डॉ. दीपक शिकारपूर, विश्व प्रेसचे विशाल सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘विश्वकर्मा पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात सध्या उपलब्ध करिअर संधींबाबत माहिती देण्यात आली असल्याने ते विद्यार्थी व पालक या दोघांसाठीही उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.
सविता मराठे या शिक्षणतज्ज्ञ, कुशल प्रशिक्षक व प्रमाणित करिअर सल्लागार आहेत. त्या स्वतःची एनरुट (www.enroutecareeradvisor.com) ही करिअर सल्ला संस्था चालवतात. या पुस्तकासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, की करिअरचे नियोजन ही कठीण प्रक्रिया असून तिच्या प्रत्येक पायरीवर काटेकोर विचार व निर्णय घेणे आवश्यक असते. ही प्रक्रिया इयत्ता दहावी व बारावीच्या पातळीवरच सुरु होते, जेथे विद्यार्थी विशिष्ट विद्याशाखा निवडतात. या विचारातूनच मी हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झाले. हे पुस्तक पालक व विद्यार्थी या दोघांनाही सुयोग्य करिअर निवडण्यात साह्य करणारे रेडी रेकनर ठरणार आहे.
आजच्या जगात करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मात्र इयत्ता दहावी व बारावीच्या टप्प्यावर योग्य विद्याशाखा निवडणे गरजेचे असल्याने असंख्य पर्यायांमुळे पालक व विद्यार्थी गोंधळून जातात. कोणत्या विद्याशाखेतून कोणते करिअर घडवता येईल, हा विचार करणे अवघड असते, कारण करिअरच्या पर्यायांच्या संख्येच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी निवडण्याच्या विद्याशाखांची (विज्ञान, वाणिज्य, कला, पदविका वगैरे.) संख्या खूपच मर्यादित आहे.
सविता मराठे पुढे म्हणाल्या, की माझे पुस्तक इयत्ता दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध विद्याशाखा व त्यात दिले जाणारे विषय यांचे विहंगावलोकन आहे. तसेच या पुस्तकात या विद्याशाखांमधून निर्माण होणारे करिअरचे वेगवेगळे मार्ग, विविध प्रवेश परीक्षा व त्यांसाठीचे पात्रता निकष अशी सविस्तर माहिती आहे. हे पुस्तक पालक व विद्यार्थ्यांना पर्याय मिळवून देते, ज्यायोगे त्यांना इयत्ता अकरावीमध्ये सुयोग्य विद्याशाखा व विषय निवडण्यास मदत होते.
पुस्तकातील माहितीला संबंधित क्षेत्रातील संस्थांच्या सविस्तर अभ्यासाचा आधार देण्यात आला आहे. या संस्थांविषयी अधिक माहिती मिळवू इच्छिणाऱ्यांना पुस्तकात दिलेल्या वेबसाईट्स साह्यभूत ठरतील. एकमेकाशी निकट संबंध असलेल्या करिअर मार्गांमधून निवड करताना इयत्ता दहावी व बारावी परीक्षांना बसणारे विद्यार्थी काहीवेळा गोंधळून जातात, कारण हे करिअरचे मार्ग वरकरणी समान दिसतात, परंतु त्यांच्यात निश्चित फरक असतात. या पुस्तकात संबंधित क्षेत्रांतील असे फरक स्पष्ट करुन सांगितले आहेत. उदाहरणार्थ – कला (आर्ट) व रचना (डिझाईन). यामुळे आपल्याला नक्की काय करायचे आहे, हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्याला मदत होईल.
या पुस्तकात कल चाचण्यांचे (ॲप्टिट्यूड टेस्ट्स) महत्त्व, या चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता जाणून घेण्यास कशा मदत करतात, विद्यार्थी आपली आवड व क्षमता यानुसार विद्याशाखा व करिअर पर्याय कसे निवडू शकतात, याबाबतही विशद करण्यात आले आहे.
थोडक्यात, या पुस्तकाचा मुख्य भर हा करिअर नियोजनावर, तसेच हे नियोजन अगदी इयत्ता दहावीपासूनच टप्प्याटप्प्याने कसे करावे, यावर आहे. मुद्दे चटकन् स्पष्ट करण्यासाठी तक्ते व फ्लोचार्ट वापरल्याने दृश्य प्रतिमा उभी राहते. पुस्तकाच्या शेवटी सर्व महत्त्वाची प्रशासकीय मंडळे, संस्था व चाचण्या घेणाऱ्या संस्थांची यादी देण्यात आली आहे. करिअरचा मार्ग घडवण्यासाठी शिक्षणाचे नियोजन करणाऱ्या सर्वांना हे पुस्तक रेडी रेकनर म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमात बोलताना डॉ. गीत यांनी सविता मराठे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रचंड विद्यार्थीसंख्येपर्यंत पोचण्यासाठी असे अधिक प्रयत्न गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
शीतल बापट म्हणाल्या, की करिअर समुपदेशन हे विज्ञान आणि तंत्र आहे. उत्तम करिअर समुपदेशक विद्यार्थ्यांना योग्य मार्ग निवडण्यास मदत करत असतो.
करिअरच्या चाकोरीबद्ध मार्गांमागे धावण्यापेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याने इच्छित करिअर निवडण्यापूर्वी प्रथम स्वतःची आवड लक्षात घेतली पाहिजे आणि पालकांनीही आपल्या पाल्याच्या निर्णयाला पाठबळ दिले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. दीपक शिकारपूर यांनी बोलून दाखवली.
पृष्ठसंख्या २६७ असलेल्या या पुस्तकाची किंमत केवळ २५० रुपये असून ते करिअरबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी जागरुक असलेल्या अनेक पालक व विद्यार्थ्यांसाठी नक्कीच आवर्जून घेण्याजोगे ठरेल.
हे पुस्तक विक्रीसाठी सर्व लोकप्रिय बुकस्टोअर्समध्ये, तसेच फ्लिपकार्ट व ॲमेझॉन या पोर्टल्सवरही उपलब्ध आहे. लवकरच ते किंडलवरही उपलब्ध होईल.
लेखिकेविषयी :
सविता मराठे, एम. एस्सी (क्लिनिकल) एम्ब्रियॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, युके, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट (पीजीडीएचएचएम) फेलोशिप इन मेडिकल एज्युकेशन
सविता या शिक्षण तज्ज्ञ, कुशल प्रशिक्षक व प्रमाणित करिअर सल्लागार आहेत. त्यांना संज्ञापन कौशल्य (कम्युनिकेशन स्किल), शिक्षण तंत्रज्ञान, अभ्यासक्रम विकास, सूचनात्मक व कार्यशाळा रचना या विषयांच्या प्रशिक्षणाचा विशाल अनुभव आहे. शिक्षण क्षेत्रात त्या नऊहून अधिक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, तसेच व्यवसाय लेखन (बिझनेस रायटिंग), रेझ्युमे निर्मिती, महाविद्यालयीन निबंध लेखन आदी अन्य संबंधित क्षेत्रांत मार्गदर्शन केले आहे. प्रशिक्षक या नात्याने त्या संज्ञापन कौशल्ये, जीवन कौशल्य व्यवस्थापन, इंग्रजी संभाषण व व्यक्तीमत्त्व संवर्धन ( सभ्यता व शिष्टाचार) या विषयांवरील कार्यशाळा घेतात. त्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसशी प्रशिक्षक म्हणून संबंधित असून तेथे शिक्षण तंत्रज्ञान, संज्ञापन कौशल्ये व व्यवसाय संज्ञापन या विषयांत शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेतात. त्या पुण्यातील ‘एनरुट करिअर ॲडव्हायजर’ (www.enroutecareeradvisor.com) या स्वतःच्या संस्थेत स्वतंत्र करिअर सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम करतात.