श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने आयोजन ; शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त आकर्षक फुलांमध्ये सजवलेल्या रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृती मध्ये शिवछत्रपती विराजमान झाले. शासनाच्या आदेशाचे पालन करुन शिवजयंती उत्सव यावर्षी देखील साधेपणाने साजरा करण्यात आला.

कोतवाल चावडी येथे झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी परिमंडळ १ पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, विशाल केदारी, अतुल चव्हाण उपस्थित होते. यावेळी डॉ.प्रियांका नारनवरे यांचा सन्मान करण्यात आला. सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
दरवर्षी शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रसंग भव्य रंगमंचावर नाटकाद्वारे सादर केले जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांचे पालन करीत ट्रस्टने पुष्पसजावट केली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यविषयक उपक्रम राबविले असून यापुढेही सामाजिक उपक्रम राबविणार आहे. रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान शिवरायांच्या मूर्तीची छबी पुणेकरांनी आपापल्या मोबाईलमध्ये टिपली.

