पुणे : येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, यशदा, चैतन्य इन्स्टिटूयट फॉर मेंटल हेल्थ, बापू ट्रस्ट, कर्वे समाज सेवा संस्था आणि स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन पुणे तसेच पुणे येथील मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या स्वयंसेवी संस्थाच्या संयुक्त विदयमाने यावर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मानसिक आरोग्य साप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. चेतन दिवान, बापू ट्रस्ट च्या भार्गवी दवर, चैतन्य इन्स्टिटूयट फॉर मेंटल हेल्थ चे राहुल शिरुरे , स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशनचे अनिल वर्तक उपस्थित होते.
अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे मार्फत साजरा करण्यात येत असलेल्या या सप्ताहाची सुरुवात दि. ८ ऑक्टोबर २०१७ पासून होत असून मानसिक आरोग्याशी निगडीत व्यावसायिक, रुग्ण, रुग्णांचे कुटुंबीय, विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, एन एस एस विभाग तसेच एम एस डब्लू महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक, पुणे व पिंपरी महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस दलातील विविध प्रतिनिधी तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित सर्व संस्था या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार असून सर्व उपस्थितांना मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती, शिक्षण व मार्गदर्शनपर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आल्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी सांगितले.
पुणे पदमावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहमाध्ये येथे पार पडणार्या या कार्यक्रमास मोफत प्रवेश देण्यात येणार असून शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र देखील देण्यात येणार आहे.
दि. 10 ऑक्टोंबर – मानसिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगाचे मानसिक आजार या विषयावर खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आलेले आहे.
दिनांक | वेळ | कार्यक्रमाचे स्वरुप |
8 ऑक्टोंबर,2017. | सकाळी 09.30
|
मानसिक आरोग्य जाणीव-जागृतीसाठी मोटार सायकल रॅली |
8 ते 12 ऑक्टोंबर,2017. | — | ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थाच्या वतीने वेगवेगळया प्रकारचे स्टॉल (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे). |
10 ऑक्टोंबर,2017. | सकाळी 10.00
ते सायंकाळी 6.00 |
सांस्कृतिक कार्यक्रम (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे). |
11 ऑक्टोंबर,2017. | सकाळी 10.00
ते सायंकाळी 6.00 |
चर्चासत्र (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे). |
12 ऑक्टोंबर,2017. | सकाळी 10.00
ते सायंकाळी 6.00 |
चर्चासत्र (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे). |
नितीन पाटील म्हणाले कि, मानसिक आरोग्याचा विषय दुर्लक्षीत राहिलेला आहे. समाजामध्ये अपुर्या जन्जागृतीमुळे रुग्णाची योग्य काळजी व देखभाल होत नाही. विविध मानसिक व सामाजिक कारणांमुळे सामोरे जावे लागत असलेल्या या परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत असतात तसेच समाजात या बाबीची अनास्था व तिरस्कार असल्यामुळे हा रोग ब-याचदा लपवून ठेवला जातो. आधुनिक उपचार पद्धतीकडे पाहता सद्य स्थितीमध्ये फक्त औषध घेणे या पर्यन्तच मर्यादित न राहता इतर ब-याच उपलब्ध असणार्या थेरपी, समुपदेशन, आहार, विहार, रुग्णाच्या नातेवाईक व हितचिंतकांचे प्रशिक्षण, योगा, नृत्य, कामकाजात बदल अशा ब-याच मानसिक-सामाजिक-कौटुंबिक पैलूंवर लक्ष केंद्रीत करणे अपेक्षीत असते.
मानसिक आजार हा सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील स्त्री -पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान मुले , वयात येणारी मुले, नोकरी व व्यावसायिक कामाचा ताण-तणाव, पारिवारिक ताण- तणाव, वैवाहिक मतभेद, मुले व पालक विसंवाद, दुष्काळ, आर्थिक अडचण, विषमता व या विविध कारणांमुळे होणारे ताण- तणाव व विविध समस्या इत्यादि अशा सर्व घटकांसाठी हा विषय महत्वाचा असून यासाठी शासन, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संघटना-संस्था मिळून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी देखील भविष्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले.