पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकसेवा ई स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पाषाण मधील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा प्रश्न जटील होत चालला आहे. त्यामुळे आपली जीवन पद्धती आणि उत्सवदेखील पर्यावरणपूरक करण्याची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती आणि इतर पर्यावरणपूरक सजावटीचे महत्व विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमध्ये पटवून देण्यात आले.
स्वतः तयार केलेल्या वस्तुंमध्ये भावनिकदृष्ट्या आपण अधिक जोडले जातो. त्याअर्थानेदेखील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरले. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांबरोबरच शाळेतील शिक्षकांनीही गणेशाच्या सुंदर मूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या संचालिका निवेदिता मडकीकर व प्राचार्या जया चेतवानी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.