पुणे दि.२२- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (गरिबी निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी) योजना २०१५ अंतर्गत अतिवंचित घटकातील महिलांना विविध सामाजिक सुरक्षा योजना आणि संजय गांधी निराधार योजनांचा लाभ मिळवून देण्यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक सुरक्षा योजना अधिकाधिक वंचित समूहांपर्यंत पोहोचविण्याकरीता सामाजिक संस्थाचा सहभाग महत्वाचा असून अशा संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव मंगल कश्यप यांनी केले.
जिल्हास्तरावरील सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीमध्ये देहविक्री व्यवसायातील महिला, ट्रांसजेंडर व्यक्ती आणि एच. आय. व्ही. संसर्गित महिलांना प्रतिनिधित्व देऊन जिल्ह्यातील सर्व महिलांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ विविध विभागांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिला जाईल असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी सांगितले.
अतिवंचित अशा विधवा/एकल महिला, अतिगंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती, देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला, ट्रांसजेंडर समूहातील व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी विधवा अनुदान अशा सर्वच योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. गरजू नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल आणि आवश्यक दाखले उपलब्ध करून दिले जातील, असे हवेली तालुक्याच्या नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांनी सांगितले. पुणे शहर तहसील कार्यालायामार्फत एस. बी. बाणखेले यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

