पुणे- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल केलेलं वक्तव्य एक षडयंत्र असून कोश्यारी यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना तयार राहावे असा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी ने आज पुण्याचे महापौर मोहोळ यांना ही प्रभाग क्रमांक २३ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही, तर यापुढे तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा आज आंदोलन करताना दिला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे ,विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ ,नगरसेवक योगेश ससाने ,सचिन दोडके ,प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,गणेश नलावडे,दिपक कामठे,दिपक जगताप,निलेश वरें,अमर तुपे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे सूत्र वापरून इतिहासाची सतत मोडतोड करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे व्यापक कारस्थान आहे. महान राष्ट्रपुरुषांचा सतत अवमान करणे व ज्यांचे इतिहासात काडीचे योगदान नाही त्यांचे उदात्तीकरण करणे ही भाजप ची मोहीम आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काल केलेलं वक्तव्य हे काही अनावधानाने केलेलं नाही, भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच तो भाग आहे. भगतसिंग कोश्यारींच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. परंतु जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे या स्वराज्यात आहेत तोपर्यंत हे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही असे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ठणकावून सांगितले. “छत्रपतींचा आशीर्वाद” म्हणत साळसूदपणाचा आव आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते वास्तवात किती टोकाचे शिवद्रोही आहेत हे वारंवार सिद्ध होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होण्यापूर्वी आपण सगळेच शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे आहोत. हीच वेळ आहे सर्व मावळ्यांनी एकजूट होण्याची, भाजप व आरएसएस चे शिवद्रोही कारस्थान उधळून लावण्याची. यापुढे या मनुवादी विचारसरणीच्या विरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार आहे, मनुवादाचा समूळ नायनाट केल्याशिवाय आता आपण शांत बसायचं नाही हा संदेश प्रशांत जगताप यांनी सर्व उपस्थितांना दिला. तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना तयार राहावे असा इशाराही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे हडपसर मधील प्रभाग क्रमांक २३ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत प्रस्ताव महापालिकेस दिला असून त्या प्रस्तावावर प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्याच प्रमाणे महापौरांनी देखील विशेषाधिकारात स्वाक्षरी करण्यास नकार दिला. शिवाय हा विषय स्थायी व मुख्य सभेत घेणार नसल्याचे सांगितले. या घटनेतून भारतीय जनता पार्टी चा खरा चेहरा उघड होत असून केवळ निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि नंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्ष पुणे महानगरपालिकेत घेत आहे. या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी भाजपला असा सूचक इशारा दिला की, जर दोन दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही, तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

