रात्री उशिरा पर्यंत चालणाऱ्या बांधकामां बाबत नियमावली ची आवश्यकता
पुणे- रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या बांधकामाबाबत संबधित कंपनीला संपर्क साधून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कंपनीचे हर्शल वझे यांनी भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांना सकाळी 7 ते रात्री 9:30 या वेळेतच काम करणार अशी ग्वाही दिली आहे .
याबाबत खर्डेकर यांनी सांगितले कि,’ कोथरूड मधील मृत्युंजय मंदिरा शेजारी मोठ्या बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. ह्या प्रकल्पाच्या कामामुळे अवतीभवती राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. केवळ ह्या प्रकल्पा मुळेच नाही तर सर्वत्र सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात तब्ब्ल दोन वर्षे ठप्प असलेल्या प्रकल्पांनी वेग घेतला असून अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम सुरु असते, त्या आवाजाचा व धुळीचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी व्यक्ती येवढेच नव्हे तर सर्वसामान्यांना ही त्रास होतो. याबाबत पुणे मनपा शी संपर्क केला असता याबाबत कोणतीच नियमावली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले व पोलिसात तक्रार करण्याची सूचना केली. मात्र पोलिसांकडून ही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
अश्याच प्रकारची तक्रार सक्सेस स्कवेयर , चिंतामणी अपार्टमेंट ,तेजलकुंज व इतर सोसायटी च्या नागरिकांनी केली आहे. त्यावरून आज मृत्युंजय मंदिराशेजारील बांधकाम प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी प्रत्यक्ष साईट वर जाऊन कंपनीशी संपर्क साधला व या त्रासाविरोधात नागरिकांसमवेत आंदोलन उभारावे लागेल असे बजावले. ह्यानंतर प्रोजेक्ट हेड श्री. वझे यांनी संपर्क साधून विस्तृत चर्चा केली.सकाळी 7 ते रात्रौ 9:30 ह्याच वेळेत काम केले जाईल, शेजारील सोसायटी जवळ पायलिंग चे काम सायंकाळी 6 वाजता बंद केले जाईल तसेच धुळी वर पाण्याचा शिडकावा केला जाईल व लवकरच येथे ग्रीन नेट लावून धुळीचा त्रास आटोक्यात आणला जाईल असे वचन त्यांनी दिले.
काही साईट वरील प्रश्न संबंधित बांधकाम व्यवसायिकाशी चर्चा करून सुटले असले तरी कामाच्या वेळा व अन्य त्रासाबाबत नियमावली करणे गरजेचे आहे असे मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले असून याबाबतचे मागणीपत्र ह्यापूर्वीच मा. आयुक्त यांना सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्रेडाई, मराठी बांधकाम व्यवसायिक संघटना अश्या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनांनी आपल्या सभासदांना ह्याबद्दल दिशानिर्देश द्यावेत असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.

