पुणे-भाजप चा प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्व प्रश्न सोडवत असतानाच मी कोथरूडचा आमदार म्हणून देखील कार्यरत असून येथील सर्व समस्या सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करत असल्याचे आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
कोथरूड मधील विविध समस्यांवर समाधान शोधण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठकीत आयोजित केली होती.बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांतदादां नी सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
आजच्या बैठकीस महापौर मुरलीधर मोहोळ,आयुक्त विक्रमकुमार,सभागृह नेते धीरज घाटे,उपमहापौर सरस्वती शेंडगे,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,कोथरूड मधील सर्व नगरसेवक,विविध खात्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध समस्यांवर ऊहापोह करण्यात आला.यात प्रामुख्याने –
१) आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्पाबाबत एन जी टी ने दिलेले आदेश व लोकभावना लक्षात घेऊन कार्यवाही करण्याची प्रशासनाला सूचना केली.
२) कोथरूड मधील विविध रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.यात प्रलंबित असलेल्या शिवणे खराडी हा १८ किमी चा रस्ता,नदीपात्रातील रस्ता,बालभारती पौड फाटा रस्ता यांच्या संदर्भात संदीप खर्डेकर यांनी जागा ताबा सह अनेक प्रश्न उपस्थित केले.नगरसेवक दीपक पोटे यांनी ही नदीपात्रातील रस्ता डी पी रस्त्याला जोडण्याबाबत सूचना केली तर नगरसेवक जयंत भावे यांनी जागा ताबा घेताना RCB देण्यात यावी अशी सूचना मांडली.
३) विगत काही वर्षात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या व नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याचे चंद्रकांतदादां नी निदर्शनास आणले व येत्या वर्षभरात अश्या सर्व ठिकाणी योग्य ती उपाययोजना करणे तसेच नाल्यांची साफसफाई,त्यांची रुंदी व खोली वाढविणे तसेच नाल्यांच्या बाजूने संरक्षक भिंत बांधणे ( रिटेनिंग वॉल ) अशी कामे करण्याची सूचना केली.याला जोडून अनेक ठिकाणी पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन ची वहनक्षमता कमी असल्याने मोठ्या व्यासाच्या नव्या लाईन टाकण्यात याव्यात असे संदीप खर्डेकर म्हणाले.
४) कोथरूड येथे वारंवार वीज जाण्याच्या घटना घडतात,अश्या स्थितीत मनपा प्रशासनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी सोडवाव्यात अशी सूचना ही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.बाळासाहेब टेमकर यांनी वीज मंडळाला काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला.
५) याव्यतिरिक्त आशीष गार्डन येथे डीपी रस्त्यात येणाऱ्या अतिक्रमणांचा विषय ही चर्चिला गेला.
६) तर बाणेर येथे गावठाण भागात ३५०/४०० घरांवर बी डी पी चे आरक्षण पडले असून ते चुकुन पडले असल्याचे प्रशासनाने मान्य केल्याचे गणेश कळमकर यांनी सांगितले,आरक्षण उठविण्याचा विषय समित्यांमधे मान्य झाला असून हा विषय त्वरित मुख्य सभेपुढे सादर करुन त्यास मान्यता घ्यावी व नागरिकांवरील अन्याय दूर करावा असेही त्यांनी सुचवले.तसेच पाषाण बाणेर लिंक रोड चे काम ही पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
७) दिलीप वेडे पाटील व गणेश वर्पे यांनी आशीष गार्डन येथे डी पी रस्त्यावरील अतिक्रमणाचा विषय मांडला व येथे रुंदीकरण केले जावे व एकलव्य कॉलेज पुढील रस्ता महमार्गाला जोडावा अशी मागणी केली.
याव्यतिरिक्त उद्यान विभागाशी संबंधित विषय ही उपस्थित करण्यात आले.अमोल बालवडकर,सुशील मेंगडे,राजा बराटे,अजय मारणे यांनी त्यांच्या भागातील विविध प्रश्न मांडले.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,माधुरीताई सहस्त्रबुद्धे,छायाताई मारणे,किरण दगडे पाटील,हर्षाली माथवड,श्रद्धा प्रभुणे,वासंती जाधव व इतर उपस्थित होते.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे,राजेंद्र मुठे,व्ही जी कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी विशिष्ट कालावधीत समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
तसेच संदीप खर्डेकर यांच्यावर प्रशासनाशी सर्व विषयांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी देण्यात आली असून दर १५ दिवसांनी क्षेत्रीय कार्यालय व महिन्यातून एकदा मनपा त बैठका घेणार असल्याचे ही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कचरा प्रकल्पांशी संबंधित विषयावर काम सुरु असून अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्य शासनाने कचरा प्रकल्पासाठी नवीन जागा मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात व त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ही स्पष्ट केले.

