पुणे : राज्य शासनाकडून वस्तू सेवा कराचा ( जीएसटी ) हिस्सा मिळावा, या मागणीकरिता खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे लोकप्रतिनिधी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विषय मार्गी लावतील, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
खडकी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाची बैठक आज शुक्रवारी झाली. या बैठकीला उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, ब्रिगेडीअर पटवर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन बलेजा उपस्थित होते.
ओंध रस्ता -खडकी रेल्वे जंक्शन वाहतूक नियोजनासाठी रेल्वे विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तात्काळ मिळावे याकरीता दिनांक १८ ऑक्टोबर रोजीच्या रेल्वे विभागीय बैठकीत विषय मांडणार असून, त्यावरही लवकर निर्णय होईल, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली. रेल्वे विभागाकडून खडकी बोर्डाला सर्व्हिस चार्जही लवकर मिळावा यासाठी त्याचा पाठपुरावा खासदार बापट करणार आहेत असेही आ.शिरोळे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीमध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांना नियोजन समितीचे सदस्य म्हणून घ्यावे, यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर चर्चा केली जाईल, असेही आ.शिरोळे यांनी सांगितले.

