पुणे: शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी 6 मीटर आणि 9 मीटर रस्त्यांचे कलम 210 अंतर्गत रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी हरकती- सुचना मागवण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
शहरामध्ये अनेक ठिकाणी कमी रुंदी असलेल्या रस्त्यावर टी डी आर वापरता येत नसल्यामुळे याठिकाणच्या बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शहरातील पेठा आणि मध्यवर्ती भागातील रस्ते कमी रुंदीचे असल्यामुळे इमारतींच्या पुनरविकासाचा प्रश्न सुध्दा प्रलंबित होता. शहरातील जुन्या भागातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब आहे. अशातच 6 मी रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या वस्तूंचा विकास करताना अशा वास्तुना टीडीआर वापरता येत नव्हता. या दोन्ही गोष्टींसोबतच शहरातील पुनर्विकासाला चालना देण्यासाठी शहरातील 6 मी. रुंदीचे 323 रस्ते 9 मी. रुंद करण्यासाठी हरकती आणि सूचना आता मागवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी परवाणगी दिल्यामुळे रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीने 323 रस्त्यांसह शहरातील सर्वच छोट्या रस्त्यांच्या रुंदीकरणास संमती दिली होती.
2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आराखडा मंजूर करताना 6 मी रस्त्याच्या कडेला असलेल्या मिळकतींवर टीडीआर वापरता येणार नाही असा निर्णय घेतला होता. त्यामुळे जुन्या शहरात तसेच समाविष्ट गावांमध्ये जुन्या इमारतींचा विकास करणे दुरापास्त झाले होते. अशातच विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना भूसंपादनाच्या बदल्यात देण्यात येणारा टीडीआर वापरण्यातही मर्यादा आल्या आहेत. टीडीआर चे दर पडल्याने भूसंपादन करण्यातही अडचणी येत आहेत. यापार्श्वभूमीवर शहरातील 6 मी रुंदीचे रस्ते 9 मी पर्यंत रुंद करण्याचा प्रस्ताव रासने यांच्या पुढाकाराने ठेवण्यात आला होता.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय
पुणे शहराच्या नियोजन बध्द विकास होण्यासाठी 6 मीटर आणि 9 मीटर रस्त्यांचे रुंदीकरण 210 अंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यशासनाने सुध्दा सुधारीत बांधकाम नियमावलीमध्ये याला सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे शहरातील रखडलेला विकास, बांधकाम प्रकल्प यांना चालना मिळणार आहे. पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न यामुळे सुटण्यास मदत होईल. शहराचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठीच हा निर्णय घेण्यात?आला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने

