पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात शनिवारी गुन्हा दाखल
मुंबई-राजकीय नेते, लोकप्रतिनिधींचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत आहेत. शुक्ला यांनी सन २०१५ ते १९ या पाच वर्षांच्या कालावधीत फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या पडताळणीत लोकप्रतिनिधींचे फोन टॅपिंग केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. सार्वजनिक आणि अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली जाते, परंतु शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगची गरज नव्हती. ड्रगरेकेट चे चुकीचे कारण , या नेत्यांचे फोन टॅपिंग केले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांनी हे फोन कशासाठी टॅप केले हे लवकरच समोर येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
तिसरा पेनड्राइव्ह फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्रालयास दिल्याचा संशय
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांबाबत पैसे मागत असल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेच्या सुनावणीवेळी वरिष्ठ सरकारी वकील दारियस खंबाटा यांनी गोपनीय माहितीचे दोन पेनड्राइव्ह सरकारच्या ताब्यात आहे, असे सांगून तिसरा पेनड्राइव्ह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्रालयास दिला, असे सांगितले होते. हा पेनड्राइव्ह फडणवीस यांना शुक्लांनी दिल्याचा आघाडी सरकारचा आरोप आहे.
भाजपच्या एजंट असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप
राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नेतृत्वात शुक्ला यांनी गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य सरकारतर्फे चौकशी करण्यात आली होती. त्या अहवालाचा दाखला देत २५ मार्च २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक, मंत्री जितेंद्र आव्हाड व मंत्री हसन मुश्रीफ यांनी रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करीत असल्याचा आरोप केला होता. दुसऱ्याच दिवशा कुंटेंच्या अहवालाच्या आधारावर २६ मार्च २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रश्मी शुक्ला १९८८ बॅचच्या अधिकारी : शुक्ला या मूळच्या मुंबई येथील रहिवासी असून सन १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. मार्च २०१६ मध्ये त्यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांची राज्य गुप्त वार्ता प्रमुख म्हणून मुंबई येथे नियुक्ती झाली होती.

