भाजपमध्ये साकारतेय स्थानिक नवे नेतृव ?
पुणे- जर महापौर पद , उपमहापौर पद यांना वर्षापेक्षा अधिक काळ कामाची संधी द्यायची असेल तर आमची हरकत नाही पण मग हाच नियम तत्कालीन काळात सभागृह नेते पदावर असलेले धीरज घाटे यांनाही का लावला नाही , त्यांना का वर्षापेक्षा अधिक काळ काम करण्याची संधी का दिली गेली नाही ? असा सवाल भाजपच्या वर्तुळात आता निर्माण झालेला असताना महापालिकेच्या स्थायी समितीचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत. रिक्त होणार्या आठ सदस्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपच्या 6 जणांचा समावेश आहे. रिक्त होणार्या या पदांवर मंगळवारी (दि. 16) नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. महापौर, तसेच उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपदावर संधी मिळावी यासाठी ९८ संख्याबळ असलेल्या भाजपमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. खासदार गिरीश बापट , आणि प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील असे २ प्रबळ नेते शहरात असल्याचे मानले जाऊ लागले आहे. माजी खासदार संजय काकडे यांचे वलय पक्षातून हळूहळू कमी होते आहे किंवा केले जाते आहे . असे असताना आता एका तरुण पदाधिकाऱ्याच्या रूपाने शहर भाजपमध्ये नवा स्मार्ट नेता साकारला जातो आहे अशी चर्चा आहे. असे जर झाले तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सातत्याने झुंज देणारे दक्षिण पुणे आणि त्यालगत च्या काही प्रतिनिधींना मात्र जोरदार धक्का बसणार आहे.
आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन आता भाजपाला सर्वपक्षीय गॅॅटमॅॅट करणारे शहराचे नेते होऊ पाहणारे पदाधिकारी हवेत कि आपल्या पक्षाचा झेंडा सामान्य माणसाच्या हृदयात तेजाने फडकता ठेवणारे तळमळीचे कार्यकर्ते हवेत यासाठी महापालिकेतील ३ पदाधिकारी निवडण्याची संधी असल्याचे मानले जाते . यातील किमान २ पदे तरी पक्षाला बदलावी लागतील असा भाजपच्या वर्तुळातील मान्यवरांचा व्होरा आहे. तिन्ही पदे आहे तशीच ठेवली तर विशिष्ट लोकांसाठी चाललेला पक्ष असा ठपका अंगावर घेत अनेकांची नाराजी पक्षाला ओढवून घ्यावी लागण्याची वेळ येऊ शकते असे या मान्यवरांचे म्हणणे आहे.
दरम्यान स्थायी समिती मध्ये रिक्त होणार्या आठ सदस्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपच्या 6 जणांचा समावेश असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणूक 2022 पुर्वी स्थायी समितीचे हे शेवटचे आर्थिक वर्ष आहे. महापालिकेत एकहाती सत्तेत असलेल्या भाजपकडे समितीच्या दहा जागा असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार, कॉंग्रेस व शिवसेनेची प्रत्येकी एक जागा आहे. 16 सदस्यिय स्थायी समितीमधील 8 जागा दरवर्षी रिक्त होतात. विद्यमान समिती अध्यक्ष हेमंत रासने, आमदार व नगरसेवक सुनिल कांबळे, दिपक पोटे, प्रकाश ढोरे, राजेंद्र शिळीमकर आणि भाजप सहयोगी रिपाइंच्या हिमाली कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांची जागा रिक्त होणार आहे. मंगळवारी होणार्या सर्वसाधारण सभेमध्ये रिक्त जागांवर सदस्यांची निवड होणार आहे.भाजपकडून विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड होण्याची जोरदार चर्चा भाजपमध्ये आहे. रासने यांना अध्यक्ष करायचे झाल्यास उद्या पुन्हा त्यांची सदस्यपदी फेरनिवड करावी लागणार आहे.

