मी सहकार क्षेत्र तोडायला नाही, जोडायला आलोय; महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र! -अमित शहा
प्रवरानगर- एकही साखर कारखाना प्रायव्हेट होऊ नये यासाठी प्रयत्न करतो आहे. मी सहकारात तोडायला नाही जोडायला आलो आहे. पण राज्य सरकारने देखील राजकारणा पलीकडे जाऊन याचा विचार करावा. राज्य सरकारने संस्थांवर कोण आहेत हे बघायला हवे. मला सल्ला देण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा, मी मूक प्रेक्षक म्हणून हे बघू शकत नाही असा इशारा देत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँक आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका आहेत. हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवालही आज येथे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केला.
येथे देशातील पहिली सहकार परिषद केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .
यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. अमित शहा म्हणाले- सहकार क्षेत्राचा पाया रचण्याचे काम पद्मश्री विखे पाटलांनी केले. मोठ्या अडचणींचा सामना करत त्यांनी ही कामे केले, त्यामुळे प्रत्येकांने ही माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे असे ते म्हणाले. हीच भूमी सहकार क्षेत्राची काशी असल्याचे सांगितले आहे. याचे श्रेय त्यांनी विखे पाटलांना दिले आहे. असे अमित शहा म्हणाले. माझ्यासमोर एखादा विषय आला तर सहकारी संस्था कोण चालवत आहे, यापेक्षा कसा चालतो हे मी बघणार आहे. पण राज्य सरकारने देखील हेच करावे, असा सल्ला अमित शहा यांनी दिला. महाराष्ट्रातील सहकार मजबूत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून राज्यातील सहकार टिकवणे आणि वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अमित शाह म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्कारांच्या खऱ्या मानकऱ्यांना हे पुरस्कार दिले जावेत या उद्देशाने पद्म पुरस्कार वितरणाचे नवे युग सुरु केले आहे असे सांगत केंद्रीय मंत्री शहा यांनी या प्रसंगी हिवरे बाजार ग्राम पंचायतीचे सरपंच पोपटराव पवार तसेच देशी वाणांच्या संवर्धनासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या आणि बीजमाता म्हणून प्रसिध्द असलेल्या राहीबाई पोपेरे या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ज्या भूमीवरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा जयघोष गाजवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच पवित्र भूमीवर मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे, म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंददायी दिवस आहे.या देशाला जेव्हा भक्तिमार्गाच्या उपदेशाची सर्वात जास्त गरज होती त्याच वेळी भक्तीची चळवळ सुरु करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची देखील हीच भूमी आहे असे ते पुढे म्हणाले. त्यांनी सांगितले की संपूर्ण जगाला श्रद्धा आणि संयमाची शिकवण देणाऱ्या साईबाबांची ही भूमी आहे.ते म्हणाले की आजच्या सरकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय निर्माण केले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी याबाबत कोणी विचार देखील केला नव्हता अशी टीका त्यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सहकार मंत्रालय स्थापन केले कारण त्यांना माहित आहे की सहकार हा विषय आजही तितकाच समयोचित आहे आणि सबका साथ, सबका विकास हा मंत्र केवळ सहकारी तत्वावर काम केल्यानेच यशस्वी होऊ शकतो.ते म्हणाले की जेव्हा सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा अनेक लोकांनी विचारले की याची उपयुक्तता काय आहे, पंतप्रधान मोदी हे काय करत आहेत, देशाला कुठे घेऊन चालले आहेत.त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आज येथे आलो आहे असे सांगून केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, आज देशातील एकूण साखर उत्पादनापैकी 31% साखरेचे उत्पादन सहकारी साखर कारखान्यांमध्ये होते, तसेच दुधाच्या एकूण उत्पादनापैकी 20% उत्पादन सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था करतात. एकूण उत्पादित गव्हापैकी 13% गहू आणि तांदळाच्या एकूण उत्पादनापैकी 20% तांदूळ यांची खरेदी सहकारी संस्थांतर्फे केली जाते, याशिवाय, देशातील 25% खतांची निर्मिती, उत्पादन आणि वितरण सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच होते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय मंत्री शाह यांनी केले. “भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था आणि कृषक भारती सहकारी संस्था या अशा सहकारी संस्था आहेत, ज्यांचा जगभरात अभ्यास केला जातो, लिज्जत पापड संस्थेचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून महिलांच्या संस्था येतात , अमूल ही अशी एक सहकारी संस्था आहे जी दररोज सकाळ संध्याकाळ 36 लाख भगिनींना पैसे देण्याचे काम करते, हे सहकाराचे यश आहे,असे श्री शाह म्हणाले. आपल्याकडे उत्पादन करण्याची, कारखाना उभारण्याची, कारखाना चालवण्याची आणि विपणन करण्याची फारच कमी आर्थिक क्षमता असेलही कदाचित परंतु आपल्याकडील संख्या मोठी आहे.सहकारातून आपण सगळे एकत्र येतो, मग आपण कोणाहीसमोर त्याच सामर्थ्याने न डगमगता उभे राहू शकतो इतकी ताकद आपली निर्माण होते, हाच सहकाराचा मूलमंत्र आहे.आणि याच मूलमंत्राच्या आधारावर आजवर देशभरात सहकारी संस्था चालवल्या गेल्या आहेत, असे शहा यांनी सांगितले. .देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून साखर कारखानदारांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या समस्या एकामागून एक सोडविण्यात आल्या.आमच्या एकाही मंत्र्याचा कच्ची साखर आयात करण्यासंदर्भात कोणताही व्यवहार नव्हता असे सांगत कच्च्या साखरेवर आयात शुल्क लावण्याचे काम नरेंद्र मोदीजींनी केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.साखर निर्यातीवर निर्यात अनुदान देण्याचे काम मोदी सरकारने केले यासोबतच इथेनॉलचा वापर वाढवणे, त्याचे मिश्रण वाढवणे, इथेनॉलच्या किमती वाढवण्याचे कामही आपल्या सरकारने केले आहे.साखर कारखाने चालू ठेवण्यासाठी आणि एकही सहकारी साखर कारखान्याचे खाजगी कारखान्यात रूपांतर करण्याची वेळ येऊ नये यादृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिलीअमित शहा म्हणाले की, मी काही मोडण्यासाठी नाही तर सहकारात भर घालण्यासाठी आलो आहे, मात्र राज्य सरकारनेही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहकाराकडे बघावे.मी मूक प्रेक्षक म्हणून शांत बसू शकत नाही, ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच आज मी इथे खूप चांगल्या पद्धतीने सांगायला आलो आहे की, तुम्ही सर्वांनी यापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे . माझ्या समोर एखादा प्रश्न आला तर सहकारी संस्था कोण चालवतंय हे कुणी पाहणार नाही मात्र ती कशाप्रकारे चालते आहे ते नक्के बघितले जाईल, याची मी खात्री देतो आणि राज्य सरकारनेही याच पद्धतीने काम करायला हवे, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली.सहकार कोणत्याही क्षेत्रातील असो आर्थिक क्षेत्रातील असो, साखर कारखान्याच्या क्षेत्रातील असो, दूध क्षेत्रातील असो, खताच्या क्षेत्रातला असो , वितरण क्षेत्र किंवा विपणन क्षेत्रातला असो, सहकाराला आजच्या काळाशी सुसंगत बनवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.जेव्हा सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्याची वेळ आली होती, त्याचवेळी मोदीजींनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली. आपण सहकाराचे विद्यापीठ बनवणार आहोत, आपण बहुराज्यीय सहकारी कायद्यातही बदल करणार आहोत आणि देशातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस ) संगणकीकृत करायच्या आहेत. जी क्षेत्र सहकाराशी संबंधित नाहीत त्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांना सहकाराशी जोडण्यासाठी सचिवांची समिती कार्यरत असून, येत्या काही दिवसांत 25 वर्षांपासूनची सहकार चळवळ पुनरुज्जीवीत करण्याचे काम करणारे सहकार धोरणही आणले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.सहकार चळवळीने आणखी 50 से 100 वर्षे या देशातील गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांना विकासाची समान संधी द्यावी , समान संधी प्रदान कराव्यात आणि सर्वांना समानतेच्या सूत्रात बांधून संपूर्ण समाजाचा विकास करावा, अशी मोदीजींची इच्छा आहे, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

