मुंबई-अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचं जाहीर केलं आहे. महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकर यांनी ट्वीटर आणि इंस्ताग्राम वर सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावरुन आक्षेप नोंदवला आहे. ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय? अशी विचारणा केली आहे. तसंच लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं नाटक असल्याचं आरोपही केला आहे.
दरम्यान महेश मांजरेकरांनी सिनेमाचा टीझर शेअर करताना म्हटलं आहे आहे की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे”.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “नथुराम गोडसेची गोष्ट नेहमीच माझ्या ह्रदयाच्या जवळ राहिली आहे. अशा पद्धतीच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धाडस लागतं. मी नेहमीच कठीण विषय आणि गोष्ट सांगताना कोणतीही तडजोड करु नये यावर विश्वास ठेवला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी याव्यतिरिक्त लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाहीये किंवा विरोधात बोलायचं नाहीये. कोण चूक कोण बरोबर हा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत”.

