मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात ,’ तुम्ही मतदारांच्या पाठिंब्याने सभागृहात निवडून आला आहात, तुम्ही कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनधी नाही, असे म्हटले. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. सभागृहात अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावर नारायण राणे यांना पत्रकारपरिषद सुरु असताना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर नारायण राणे प्रचंड संतापले. कोण अजित पवार? मी त्याला ओळखत नाही. जनतेच्या पैशांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणाऱ्याचे दाखले तुम्ही मला काय देता, असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.
तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढला असेल तर त्यामध्ये गैर काय होते? आदित्य ठाकरे यांना या गोष्टीचा राग का यावा? वाघाची मांजर कधी झाली. त्यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? माझ्या मते आदित्य ठाकरे यांचा आवाज तसा नाही. आदित्य ठाकरे तिथून जात असताना एखादा वेगळा आवाज काढला असता तर मग लगेच त्यांना त्या प्राण्याची उपमा लागू होते का, असा सवालही नारायण राणे यांनी विचारला.
विधीमंडळात सर्वात चांगले काम नितेश राणे करतो. हीच त्यांची पोटदुखी आहे, राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे असा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी केला आहे.नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, ‘सिंधुदुर्गातील शिवसैनिकावरील हल्ल्याचा प्रकरणाचा नितेश राणेंचा काहीच संबंध नाही तसेच या प्रकरणात नितेश राणेंचे नाव जाणिवपूर्वक टाकले जात आहे. राज्याचा अॅडिशनल डीजी, राज्यातील पोलिस तिथे आले. असं काय घडलं की, एवढी यंत्रणा तिथे आली. अशा छोट्या मोठ्या गोष्टी सगळीकडे होत असतात. यासाठी एवढी यंत्रणा का आली? कुठूनही नाव गोवायचं आणि त्यासाठी कलम 307 लावायची. खरचटल्यासाठी ही कलम लावली आहे. नितेश राणेंचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे.’
अदित्य ठाकरेंचा आणि मांजरीचा संबंध काय?
नितेश राणे यांच्या म्याव म्याव प्रकरणावर देखील नारायण राणेंनी भाष्य केले आहे. नितेश राणेंनी कसला आवाज काढला. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. तसेच तो विधानभवनात बोललेला नाही. तो पायऱ्यांवर बसून बोललेला आहे. तसेच पंतप्रधानांची नक्कल केल्यावरुन राणे म्हणाले की, भास्कर जाधवांना जशास तसे उत्तर दिले जाईल.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष परब यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीसाठी थेट नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांना दोन वेळा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. याच प्रकरणात मुख्य आरोपी सचिन सातपुते याला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर आता नितेश राणेंना अटक होणार अशी शक्यता आहे. तत्पूर्वी पोलिसांनी नितेश राणेंना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, ते हजर झाले नाहीत.यानंतर त्यांनी थेट कोर्टात अर्ज दाखल केला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी 24 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. राणे यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याच दिवशी जामीनावर मुक्तता करण्यात आली होती .

