१९८७ पासून .. रस्ता होतोच आहे ….बिल्डरांच्या हितासाठी रस्त्याची दिशा जातेय .
महापालिका आयुक्तांना कॉंग्रेस गटनेते आबा बागुलांचे पत्र
मा.महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका.
यांसी…
महोदय
एच.सी.एम.टी.आर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून प्रशासनास हा प्रकल्प करावयाचा नसल्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकल्प पुणे महापालिकेने गेली ४० वर्ष रखडविला असून शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासून झाल्यानंतर हा प्रकल्प ४०० वर्षांनंतर तरी करणार का ? लाखो पुणेकरांचे वाहतूक समस्येमुळे अपघाती मृत्यु झाल्यानंतर हा रस्ता करणार का ? भविष्यात प्रशासनाला सदर प्रकरणी ज्या अलाईनमेंट बदल करावयाच्या आहेत ते सर्व बदल त्यांच्या मर्जीप्रमाणे झाल्यानंतर तरी हा रस्ता करणार का ? कोणीही या प्रकल्पाबाबत एन.जी.टी. मध्ये जाऊन प्रकल्पास खोडा घालण्याचा प्रयत्न करते, तरी देखील प्रशासन याबाबत गांभीर्याने विचार का करत नाही ? हा प्रकल्प प्रशासनास पूर्णत्वास महत्वपूर्ण वाटत नव्हता तर सन २०१७ च्या विकास आराखडयामध्ये याचा समावेश का करण्यात आला ? सन १९८७ मध्ये दूरदृष्टी असलेले तत्कालीन प्रशासकीय अधिकारी यांनी भविष्यातील पुणे शहरातील वाहतूक समस्येचा वेध घेवून हा रस्ता आखला ते वेडे होते का ? हा प्रकल्प करताना अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच एलिव्हेटेड रस्ता करणेचे नियोजन असतानाही याचे प्रशासनास काय वावडे आहे ? प्रशासनास यामधून नेमके काय साध्य करायचे आहे ? असे अनेक प्रश्न आम्हास भेडसावत आहेत. आम्ही वेडे आहोत म्हणून गेली १५ वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहोत असे आता आम्हास वाटत आहे.
सन १९८७ च्या विकास आराखडयामध्ये वाहतूक समस्येचा वेध घेत एच.सी.एम.टी.आर रस्त्याची आखणी करण्यात आली होती. वाढती लोकसंख्या व वाहतूक समस्या पाहता गेली १५ वर्षांपासून सदर रस्ता करणेबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सन १९८७ नंतर सन २०१७ च्या मान्य विकास आराखडयामध्ये हा प्रकल्पास मान्यता दिलेली आहे. एच.सी.एम.टी.आर रस्ता शहराच्या वाहतूकीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा असून यामध्ये बीआरटी मार्ग देखील आहेत. तसेच एच.सी.एम.टी.आर रस्त्याची जे.एम. झाली असून कन्सलटंट देखील नेमण्यात आला आहे. एच.सी.एम.टी.आर रस्ता करणेसाठी बहुतांशी जागेचे भूसंपादन झाले असून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही निविदा जादा दराने आल्याने रदद करण्यात आली. या प्रकल्पाचे पैसे टप्याटप्याने देण्यात येणार असून ३ वर्षात रस्ता करण्यात येणार होता. सदर प्रकल्प तातडीने मार्गी लागणे आवश्यक असताना प्रशासनाकडून काही बांधकाम विकसकांच्या व अन्य हितापोटी या रस्त्याची अलाईनमेंट बदलणेची कार्यवाही तत्परतेने केली जाते. शहरातील वाहतूकीची समस्या सोडविणेसाठी मोबिलीटी प्लॅन तयार करण्यात आला होता. हा प्लॅन एच.सी.एम.टी.आर प्रकल्पाशी सुसंगत करण्यात आला असून अलाईनमेंट बदलामुळे यामध्ये विसंगती होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
तरी शहरातील वाहतूक समस्या सोडविणारा एच.सी.एम.टी.आर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प करणेकामी मुख्य सभेने निर्णय घेवून प्रशासनाला आदेश दयावेत. अन्यथा पुणेकर आपणा सर्वांना माफ करणार नाहीत.
आबा बागुल
काँग्रेस गटनेता
पुणे मनपा

