‘प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे’ असे म्हणत संजय राऊतांनी ईडी आणि भाजपवर टीका केली होती. आता या टिकेला भाजप नेते प्रविण दरेकरांनी उत्तर दिले आहे. ‘घरी नसताना एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडले, यात कोणती मर्दानगी? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे. त्यावरुन आता दरेकरांनी त्यांना कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईची आठवण शिवसेनेला करुन दिली आहे.
प्रताप सरनाईक सध्या विदेशात आहे. त्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. याचा निषेध करताना राऊत म्हणाले होते की,’प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपने सरळ लढाई पाहिजे. शिखंडीसारखे ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये’ असे राऊत म्हणाले होते. यालाच प्रविण दरेकरांनी कंगनावरील कारवाईची आठवण करुन देत सवाल केला आहे.
दरेकर ट्विट करत म्हणाले की, ‘प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी”,असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारले पाहिजे, एक महिला घरी नसताना… सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचे ऑफिस उद्ध्वस्त केले, यात कोणती मर्दानगी होती?’
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. सध्या शोधमोहीम सुरु आहे. यासोबतच सरनाईकांसंबंधीत इतर 10 ठिकाणांवरही ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या मुलांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले होते. तसेच ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाले आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याची माहिती आहे.

