जगण्याचा वेग वाढलेला आहे पण भावनांची गती मात्र तेवढीच आहे. जगण्याचा हा वेग आणि भावनांचा आवेग यांच्यातली गमतीशीर तारांबळ म्हणजेच ‘What’s Up लग्न’ हा सिनेमा !!!! भावना म्हटल्या की गाणी आलीच….माणसाच्या भावना पोहोचवायला गाण्याइतकं सुंदर माध्यम दुसर नाही. मात्र चित्रपटाच्या कथानकाला साजेशी गाणी करताना ती तितकीच आशयघन तरीही सहज सोपे शब्द सांगणारी असली पाहिजेत. त्याला तितकेच तरल आणि उत्कट संगीतही लाभले पाहिजे. आणि हा सुंदर मेळ जमून आला आहे, ‘What’s Up लग्न’ या चित्रपटाच्या सगळ्या गाण्यांमध्ये.
रोमँटिक गाणी म्हटली की, रसिकांच्या मनात २ नावं सहज येतात – संगीतकार निलेश मोहरीर व गीतकार अश्विनी शेंडे !!! या सांगीतिक जोडीने कितीतरी मधाळ गाणी मराठी रसिकांना दिलीयेत. इतकी सुंदर रोमँटिक गाणी दिल्यानंतरही, प्रत्येक नवीन गाणं तितकंच फ्रेश मिळणार यात रसिकांना कधीच शंका नसते. ‘What’s Up लग्न’ या चित्रपटासाठी सुद्धा या जोडीने ही किमया साधली आहे.
‘तू जराशी ये उराशी’ या गाण्यातून या जोडीने प्रेमा मागाची उत्कटता! व त्यातील भावनेची खोली याचा सुरेख मेळ साधला आहे. प्रत्येक गाण्याची स्व:ताची अशी एक खासियत असते. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्याची खासियत म्हणजे आधी चाल बांधून नंतर ते शब्दबद्ध करण्यात आलं. हनिमून हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं वळण असतं. एकमेकांच्या सहवासातून फुलणारं प्रेम व्यक्त करणार हे गाणं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास गीतकार अश्विनी शेंडे व संगीतकार निलेश मोहरीर यांनी व्यक्त केला आहे.
शब्दांचं सामर्थ्य आणि स्वरांची भावोत्कटता यांचा संगम झाला, की त्यातून सुरेल गीत जन्माला येतं. गाणं साकार करणं हा सगळा अनुभव अत्यंत रोमांचकारी असतो. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्याच्या बाबतीत निर्माते व दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी केलेलं सहकार्य व गाणं कसं असावं याबाबतीतलं त्याचं स्पष्ट व्हिजन यामुळे हे गाणं जमून आल्याचं मत या दोघांनी व्यक्त केलं. शिवाय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांच्या केमिस्ट्रीमुळे तसेच गायक हृषीकेश रानडे आणि गायिका निहिरा जोशी यांच्या मधुर स्वरांनी या गाण्याची रंगत आणखीनच वाढवली आहे. चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं या हेतूने ३ महिने आधीच हे गाणं प्रदर्शित करण्याचा व त्याच्या प्रसिद्धीतही वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी आवर्जून केला आहे. याबाबतीत बोलताना विश्वास जोशी सांगतात की, शेवटी, खऱ्या अर्थे, चित्रपटाआधी सुद्धा त्याचे गाणेच लोकांना अपील होते. आणि चित्रपट संपल्यावरही लोक तेच गुणगुणत घरी जातात. हीच खरी संगीताची ताकद असते.
फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या ‘What’s Up लग्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांचे आहे. जाई जोशी आणि नानूजयसिंघानी प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी रसिकांना ९ फेब्रुवारी २०१८ पर्यत वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांना या फिल्मच्या सुमधुर आणि मधाळ गीतांचा आस्वाद नक्की घेता येईल.