Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

माळीण दुर्घटनेनंतर राज्यकर्त्यांनी काय धडा घेतला..! महापुराच्या संकटातही ‘राजकारणा’चा चिखल..!!

Date:

महापुरामुळे आलेल्या संकटांवर उपाययोजना करण्यापेक्षा सध्या नेत्यांच्या पूर पर्यटनावरच जास्त चर्चा होऊ लागल्या आहेत. पूर आला तर दोष कुणाचा, धोक्याची सूचना देणाऱ्या नव्या कार्यप्रणाली यंत्रणांचा विचार का केला जात नाही. महाभयंकर परिस्थितीत सरकारी यंत्रणा उशिरा का पोहोचतात. यावर सक्षम यंत्रणा का उभी केली जात नाही. ३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर डोंगर परिसरातील गावांबाबत अद्याप सरकारने धोरणं का आखली नाहीत. यावर ना राजकारण्यांनी विचार केला, ना सरकारी बाबूंनी धोरणं आखली. मग याला जबाबदार धरायचे तरी कोणाला ? निसर्गाची छेड काढणाऱ्या बेजबाबदार लोकांना. अकार्यक्षम प्रशासनाला की, राज्य कारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांना..? अशा अनेक विचारांचा चिखल मनामध्ये साचतोय. अशातच महापुराच्या संकट काळात मदत कार्य राहते बाजूला अन राजकीय चिखल फेक जेंव्हा सुरू होते, तेंव्हा मात्र या दलदलीचा परिणाम बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांवर होतो, ही वेदनादायी बाब आहे.
महाराष्ट्रात महापुराचे संकट पहिल्यांदाच आले आहे, असे म्हणता येणार नाही. जुलै २००५ यावर्षाची अतिवृष्टी आठवली तरी अंगावर काटा येतो. २०१८मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग महापुराच्या पाण्याने वेढला होता. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्या आठवणी अजून स्मरणातून गेल्या नाहीत. त्याही पेक्षा महाभयंकर घटना ३० जुलै २०१४ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली होती. अजूनही त्या जखमा ओल्या आहेत. एका दुर्दैवी पहाटे डोंगर कोसळला आणि त्याखाली सारे माळीण गाव गाडले गेले. त्यामध्ये ४४ कुटुंबातील १५१ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. नऊ जण जखमी झाले. सर्वच बेघर झाले होते. त्या घटनेमुळे काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अद्यापही पूर्ण मिटलेल्या नाहीत. रात्रभर पडलेला पाऊस, डोंगराला पडलेल्या भेगा अन् त्यामुळे भिंगरी सारखी डोंगरावरची भिरभिरत आलेली झाडं आणि दगडं. काही क्षणांत गाव गाडलं गेलं. निसर्ग एवढा कोपला होता की साधं सावरण्याची संधी कोणाला दिली नाही. आज या घटनेला पूर्ण सात वर्षे झाली आहेत. परंतु त्यानंतर आपल्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी या पासून धडा घेतलेला दिसत नाही. हे जवळ – जवळ स्पष्ट दिसत आहे. केवळ दुर्घटनेनंतर सांत्वन करण्याच्या नावाखाली पूरपर्यटन करण्यापलीकडे दूरदृष्टीच्या उपाययोजना करण्याची मानसिकता यांच्यात दिसत नाही. काही दिवसांपासून बेफाम कोसळणारा पाऊस, पावसामुळे घरांवर कोसळलेली दरड. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात उडालेला हाहाःकार..! अंगावर काटा आणतो. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथील असलेले डोंगर अन कोसळणाऱ्या दरडी काळ बनून आल्या आहेत. काही क्षणांत “होत्याचे नव्हते झाले”

माळीण सारखीच घटना महाड तालुक्यातील तळीये या दुर्गम भागातील गावात २२ जुलै २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. या संपूर्ण गावावर दरड कोसळली, मात्र प्रशासनाला दुर्घटनेनंतर तब्बल वीस तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी माहिती समजली. तो पर्यंत स्थानिकांनी प्रशासनाच्या बचाव कार्याची वाट न पहाता दरडी खाली गाडलेल्या काही लोकांना बाहेर काढले. प्रचंड पाऊस, अतिवृष्टीमुळे मदत कार्यात येणारे अडथळे, या सर्वच संकटांशी स्थानिक लोकं सामना करत होती. रात्रीच्या वेळी अंधारात गाडले गेलेले गावकरी मदतीसाठी टाहो फोडत होते. पण प्रशासनाच्या कुचकामी उपाययोजनांमुळे बचाव कार्याची मदत वेळेत पोहोचू शकली नाही. यामुळे ५३ जणांना आपला नाहक जीव गमवावा लागला, तर अजूनही काही लोकांचा शोध लागलेला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान प्रसिद्धी माध्यमांची टिम रस्त्यावरील दरडी बाजूला करून तळीये गावात पोहोचते, त्यानंतर विरोधीपक्ष नेते मदत कार्याला धावून जातात. मग महाड तहसिलदार आले. २३ जुलैला दुपारी एक वाजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे एनडीआरएफच्या तुकड्या बचाव कार्यासाठी तळीये गावात पोहोचल्या. तोपर्यंत अनेक निष्पाप बळी गेले. याच दरम्यान चिपळूणमध्ये पावसाने थैमान घातले होते. घरांवर पाणी आले होते. शहरात घुसलेल्या महापुरामुळे अवघ्या महाराष्ट्राचे वैभव असणारे लोकमान्य टिळक स्मारक वस्तू संग्रहालय पाण्यात बुडाले. अश्मयुगातील हत्यारे, शिवकालीन ढाली, तलवारी, सातवाहन काळातील नाणी, वेगवेगळ्या खंडातील दस्तऐवज, दुर्मिळ मुर्त्या, पुरातन काळातील साक्ष देणारी जाती, भांडी अक्षरशः पुराने गिळंकृत केली. खरं तर टिळक स्मारकाला पुराचा हा दुसऱ्यांदा बसलेला तडाखा आहे. २००५ सालाच्या पुराचा फटका या स्मारकाला बसला होता. तरी एकाही राज्यकर्त्यांना त्याचे महत्व वाटले नाही. आज हा संस्कृतीचा ठेवा पुन्हा मिळू शकतो का? हा प्रश्न कोणाला विचारायचा. २४ आणि २५ जुलैला कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याच्या काही भागाला पुराचा मोठा वेढा पडलेला होता. जीव मुठीत धरून काही लोकं स्थलांतरित होत होती. आपल्या तान्ह्या बाळांना हातात घेऊ माय माऊल्या मिळेल तिथे आसरा शोधत होत्या. आपल्या मुलांपेक्षा ही जीव लावलेली जनावरं शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वाहून गेली. शेतीचे नुकसान झाले. समुद्रा ऐवजी पुराने वेढलेल्या कोल्हापूर, सांगलीच्या गावागावात चक्क बोटीने एनडीआरएफचे जवान लोकांना घेऊन दुसरीकडे स्थलांतरित करीत होते. महिन्यात सरासरी जेवढा पाऊस पडतो, तेवढा पाऊस काही गावात चोवीस तासात पडला. नद्या भयावह झाल्या. फारशी सावरायची संधी न देता अवघ्या काही तासात आलेल्या निर्दयी पुराने या भागात होत्याचं नव्हतं केलं.
अशा या भयंकर घटना आता वारंवार का होऊ लागल्या आहेत. धरणाचं पाणी गावागावात कसे शिरू लागले. अतिक्रमण आणि टोलेजंग इमारतीमुळे पाणी जायला कुठे तरी अडथळा निर्माण होवू लागला आहे का? यावर गांभीर्याने विचार सरकारला करावा लागेल.
अशा या जुलै २०२१ च्या अखेरीस महाराष्ट्रावर आलेल्या संकटात ही आपल्या राजकारण्यांनी मात्र एकमेकांवर चिखल फेक करण्याची संधी मात्र सोडली नाही. कधी गावांकडे ढुंकूनही न फिरकणाऱ्या अनेक राजकारण्यांनी आपलं “पूरपर्यटन” यानिमित्ताने करून घेतले. डोंगर दऱ्यांमध्ये राहणारी माणसं कशी राहतात. कशाशी काय खातात, यांचा रोजगार काय. दैनंदिन जीवनात जगतात कसे..! असे खडतर आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीवर कधी भाष्य न करणाऱ्या राजकीय मंडळी आता प्रत्येक महापुराच्या ठिकाणी जाऊन लोकांना धीर देत आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. यानिमित्ताने तरी त्यांच्या डोळ्यांत अश्रूंचा महापूर ओसंडून वाहतांना दिसला.
पण आता अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी राज्यातील राज्यकर्त्यांना, प्रशासनातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे. आपल्याकडे धोक्याच्या सूचना देणाऱ्या यंत्रणा कुठंच दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक संकटकाळी उपविभागीय स्तरावर “मॉनिटरिंग” करणारी सक्षम यंत्रणा हवी. वातावरणाचा अंदाज, वाऱ्याचा वेग, दिशा आणि दाब सांगणारी आधुनिक यंत्रणा जिल्हास्तरीय ठिकाणी असलीच पाहिजे. तरच कुठे तरी पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळू शकते.
राज्यात उष्माघाताची लाट, अतिवृष्टी, चक्री वादळ, थंडीची लाट असे हवामान बदलाचे कालचक्र सुरूच असते. पण यावर अभ्यास करणारी नवीन कार्यप्रणाली यंत्रणा आणि या साऱ्यांची निरीक्षणे करणाऱ्या तज्ञांचा अभाव महाराष्ट्रात दिसतोय. यावर तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने पावलं उचलणे गरजेचे वाटते. नाही तर पुढच्या पावसाळ्यात अशा पुन्हा दुर्घटना घडल्या तर जनता राज्यकर्त्यांना माफ करणार नाही.

लेखकखंडुराज शं. गायकवाड
मेल khandurajgkwd@gmail.com

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेहरू,इंदिराजी,राजीव आणि सोनिया गांधीना व्होट चोरीप्रकरणी अमित शहांनी केले लक्ष….(व्हिडीओ)

कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी अखेरीस केला सभात्याग .. नवी दिल्ली-...

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही केला? अखेरीस पुणे पोलिसांना हाय कोर्टानेही केला सवाल

पुणे-मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे नाव का...

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...