- वीजबिल भरा, सहकार्य करा – महावितरणचे आवाहन
पुणे : गेल्या दोन महिन्यांत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 9 लाख 90 हजार वीजग्राहकांनी वीजबिलांचे तब्बल 394 कोटी 22 लाख रुपये थकविले असून सद्यस्थितीत या वर्गवारीतील 28 लाख 55 हजार ग्राहकांकडे 1359 कोटी 4 लाखांची थकबाकी झाली आहे. महावितरणची आर्थिक घडी विस्कटली असताना पुन्हा थकबाकी वाढत असल्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभागात मार्चअखेर लघुदाब वर्गवारीच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 18 लाख 65 हजार 50 ग्राहकांकडे 964 कोटी 83 लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र एप्रिल व मे महिन्यांत वीजबिलांचा भरणा न झाल्यामुळे सद्यस्थितीत 28 लाख 55 हजार वीजग्राहकांकडे ही थकबाकी 1359 कोटी 4 लाखांवर गेली आहे. या दोन महिन्यात सर्वाधिक 8 लाख 6 हजार 866 घरगुती ग्राहकांकडे 210 कोटी 31 लाख, 1 लाख 60 हजार 450 वाणिज्यिक ग्राहकांकडे 117 कोटी तसेच 22 हजार 824 औद्योगिक ग्राहकांकडे 66 कोटी 89 लाख रुपयांची थकबाकी वाढली आहे. सद्यस्थितीत लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा (12,97,225)– 735 कोटी 95 लाख, सातारा (3,16,820)– 77 कोटी 73 लाख, सोलापूर (4,35,210)– 188 कोटी 48, सांगली (3,21,150)– 121 कोटी 41 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात (4,84,770)- 235 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या व तौक्ते चक्रीवादळाच्या आपात्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणचे वीजयोद्धे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र व अविश्रांत राबले आहेत. आता पावसाळा सुरु झाल्याने महावितरणची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून वीजबिलांचा व थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. महावितरणची आर्थिक भिस्त केवळ वीजबिलांच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे बहुतांश अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु झालेले आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

