पुणे- संभाजी पुलावरून मेट्रोचा पुल हा गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरत असल्याने आज मंडळे आणि सभागृहात विरोधकांनी आंदोलन केल्याने कामकाज होऊ दिले नाही . या विषयावर आम्ही नेहमीच सहयोगाची भूमिका पत्करली आहे . पुण्याची संस्कृती परंपरा याबाबत आम्हालाही अभिमान आहेच या साठी आम्ही उपमुख्य मंत्री आणि नगरविकास मंत्री यांची भेट घेऊन यावर काय मार्ग काढता येईल यासाठी चर्चा करू असा आमचा पवित्रा असतानाही आज महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल , पृथ्वीराज सुतार , वसंत मोरे , साईनाथ बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करत ,आन्दोलन सुरूच ठेवले आणि महापालिकेचे कामकाज ठप्प पाडले हि बाब चुकीची आहे आणि राजकारण करून दिशाभूल करणारी आहे असा आरोप महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केला आहे.
ते म्हणाले ,’ महानगर पालिकेची सर्वसाधारण झाल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊ. यावर काही उपाय काढता येईल का? यासाठी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व पक्षांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असा उपाय सुचविला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यात रस नव्हता. केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही आम्ही दोन्ही नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यास तयार आहोत.

