मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक ते प्रयत्न करू – खासदार शरद पवार

Date:

मराठी भाषिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – शरद पवार

नाशिक,दि.५ डिसेंबर :- आपल्याला नव्या पिढीतून रोबो घडवायचे नाहीत. माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि ते मातृभाषेतूनच जपलं जाऊ शकतं असा माझा विश्वास आहे. साहित्य रसिकांना माझी विनंती की, त्यांनी मराठी भाषिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. संमेलनाच्या समारोप प्रसंगी नाशिकच्या गोदाकाठी हा साहित्य कुंभमेळा यशस्वीपणे आयोजित करणाऱ्या लोकहितवादी मंडळाचे, संमेलानाध्यक्षांचे तसेच सहभागी साहित्यिक व साहित्यप्रेमींचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे खासदार शरद पवार, स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ,ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत गोडसे,कार्यवाह दादा गोऱ्हे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, हेमंत टकले, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, दीपक चंदे, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, प्रतिभा सराफ, प्रशांत देशपांडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की,इंग्रजी वाघीणीचे दूध असेल पण एतदेशीय भाषांच्या विकसनावर ते विरजनाचं काम करत होतं . विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा विडा अनेक राजकीय , समाजसुधारक , सुशिक्षित लोकांनी उचलला . महात्मा ज्योतीराव फुले , सावित्रीबाई फुले , महादेव रानडे , गोखले , आगरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , वि . दा . सावरकर कितीतरी नावे घ्यावीत ज्यांनी राजकीय अथवा सामाजिक कार्याबरोबरच मराठी साहित्याची सेवा केली . मराठी भाषेच्या संवर्धनाची तळमळ असणाऱ्या सुशिक्षितांमध्ये ज्ञानकोशकार तथा श्रीधर व्यंकटेश केतकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल . छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशाचा घालून दिलेला आदर्श त्यांनी अंगिकारला , केतकरांना नेहमी वाटे की , मराठी माणसाचे बौद्धिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर मराठी भाषेचे स्वामीत्व अबाधित राहिले पाहिजे . देशी भाषेत राज्यकारभार असणारे सरकार खरे सरकार अशी त्यांची भुमीका होती . न्यायालयीन निवाडे देशी भाषेत व्हावे असे ठाम त्यावेळी त्यांनी मांडले होते . राज्यकारभारात मराठी आली आहे पण दुर्दैवाने आजही न्यायालयीन निवाडे सामान्य माणसांसाठी दुर्बोध आहेत असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले पण अध्यापन क्षेत्रात मराठी भाषेचा प्रवास तसा खडतर राहिला. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्ये अस्तित्वात येत असताना भाषिक अस्मितेचा अंगार मुलत होता. भाषावार राज्य निर्मितीनंतर राज्यांतर्गत भाषेची अभिवृद्धी होणे अपेक्षित होते , परंतू तसे म्हणावे त्या वेगाने घडत नव्हते , पदवी परीक्षेला मराठी विषय पहिल्यांदा १९२१ साली आला. मात्र आपणास आश्चर्य वाटेल की मुंबई विद्यापीठात मराठी विभाग स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांनंतर म्हणजे १९६९ -७० मध्ये सुरू झाला . मराठी भाषेच्या संवर्धनात स्व . यशवंतराव चव्हाणांनी मात्र अतिशय कष्ट घेतले. ह्या प्रसंगी त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करणे औचित्याचे आहे . ते स्वतः एक उत्तम लेखक तर होतेच पण साहित्यवाचनात त्यांची आजही कोणी बरोबरी करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेचा विकास केवळ साहित्यिक अंगाने होऊ नये तर मराठी भाषेच्या माध्यमातून वैज्ञानिक आविष्कार घडावेत अशी त्यांची पोटतिडिक होती . त्यांनी राज्यात स्वतंत्र भाषा संचालनालय स्थापन केले , शासन व्यवहार कोश निर्माण करण्यात पुढाकार घेतला . त्यांच्या कारकीर्दीत राज्यात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ , मराठी विश्वकोश मंडळ स्थापन झाले . महाराष्ट्र शासनाने वाजवी किमतीत ग्रंथ प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले . महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पुस्तकांची निर्मिती करण्याचे मोलाचे काम केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश निर्मितीचे शिवधनुष्य उचलले . ह्या सर्व प्रयत्नांमुळे कोश निर्मितीत महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, यशवंतरावांच्या कालखंडात हे जोमाने चालणारे प्रयत्न नंतरच्या काळात थंड झाले. ग्रंथनिर्मिती मंडळ आता बंद पडले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडली याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आता आली आहे . राज्य मराठी भाषिकांचे राज्य म्हणून निर्माण झाले त्या राज्यात ममराठी भाषे मचे नेमके काय झाले ? आपण आपल्या भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी इतक्या वर्षात काय केले ? आज मराठी भाषा नेमकी कुठे आहे ? याचा लेखाजोखा मांडला जावा आणि मराठी भाषेच्या सर्वागिण वृद्धीसाठी राज्यशासनाने पुन्हा कार्यक्रम हाती घ्यावा असे मी आवाहन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, संगणकीय युगात माहितीचा विस्फोट झाला आहे. परकीय भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत प्रवेश करू लागले आहेत . परकीय भाषांमध्ये नवनवीन शब्दांची निर्मिती होत आहे . त्यामुळे सध्याचे शब्दकोश कालानुरूप सुधारित करणं महत्वाचे आहे . इतर भाषांमध्ये होतं ते काम वेगाने घडत आहे . आपणही से करावयास हवे. बहुजनांच्या भाषेला बोलीभाषेला साहित्यात व मराठी कोशात अधिकाधिक स्थान द्यावयास हवे. प्रारंभी समाजसुधारकांच्या लिखाणाला शब्दांना कोशकार स्थान देत नसत . ज्ञानकोशकार केतकरांवर देखील तशी टिपणी झाली होती . ज्योतीराव फुलेंच्या साहित्यातील शब्दांना कोशकारांनी दूर ठेवले होते . परंतु बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात . भाषा पांडित्यप्रचूर, क्लिष्ट न राहता सोपी , ओघवती होते. आपण पाहातो की , संगणक अथवा इंटरनेटच्या जमान्यात कॅची वर्ड संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल . दर दहा मैलाला भाषा बदलते असे म्हणतात . थोडक्यात प्रत्येक भागाची एक वेगळी भाषाशैली आहे . मला वाटते की , आपण आपल्या प्रमाण भाषेबद्दलचा दुराग्रह सोडून ह्या सर्व इतर शैलींना शब्दांना स्थान द्यावे. मराठी भाषा स्थानीक बोलीभाषांच्या बाबतीत समावेशक झाली तरच ती अधिक समृद्ध होईल असे माझे ठाम मत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणता येईल का ? याकडे लक्ष देणे व आधुनिकता आणण्यासाठी सातत्याने काम करणे अत्यावश्यक आहे . नाहीतर माहितीच्या वेगवान जगात मराठी खूप मागे पडेल . तसेच पदवी – पदव्युत्तर लिखाणात मराठी भाषा कमी होत चालली आहे . यशवंतराव चव्हाणांना मराठी भाषेची वैज्ञानिक प्रांतात वृद्धी व्हावी अशी कळकळ होती . दहावी पर्यंत विज्ञानात मराठी भाषा आहे . परंतू पदवी व नंतरच्या अध्यापनात मराठी दिसत नाही . मराठी भाषेची पिछेहाट होण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे . महाविद्यालयीन शिक्षणासाठी इंग्रजी भाषा महत्वाची ह्या समजामुळे शालेय शिक्षणासाठी सुद्धा मराठी पेक्षा इंग्रजी भाषेला पसंती दिली जाते हा धोका मार मोठा आहे . संख्येअभावी मराठी शाळा बंद होण्याइतपत गंभीर परिस्थिती आज निर्माण होताना दिसते आहे . त्यामुळे पदवी व नंतरचे विज्ञान , वाणिज्य व इतर शिक्षण मराठीतून देण्याचा विचार व्हावा असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी त्यांनी आपल्या काव्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्याग्रह मांडला आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला कोणी नाशिककर व महाराष्ट्रातील नागरिक करू शकत नाही. मात्र काही लोक त्यावर वाद निर्माण करतात याची खंत आहे. कुसुमाग्रजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साहित्य संमेलनाला त्यांचे नाव दिले हे स्वागतार्ह आहे. मराठी साहित्य संमेलनात त्यांचे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. मराठी भाषेच्या विकासासाठी त्यात्यासाहेब यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे सांगत साहित्य संमेलन म्हटले की वाद निर्माण करणं ही परंपरा पडत आहे काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाषेचा विकास करण्यासाठी तिचा वापर वाढविणे आवश्यक – न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

यावेळी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले की,आपल्या राज्यघटनेने विचार करण्याचा आणि विचारांचा विकास करण्यासाठी अधिकार दिला आहे. शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. बालवयापासूनच मराठी भाषा शिकविली गेली तर त्यात विशेष प्राविण्य मिळवता येणे शक्य आहे. आपली स्वतःच्या भाषेचा अधिक वापर केला पाहिजे. मराठी ही ज्ञान भाषा करावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांचे प्रयत्न त्या काळापासून होते. ही भाषा ज्ञान भाषा आपल्याला करायची असेल तर तिचा वापर वाढला पाहिजे. मराठी भाषा अधिक वाढविण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची देखील तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे आदर्शच त्यांचा संमेलनालात यथोचित सन्मान – छगन भुजबळ

कविवर्य कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध का याबद्दल दुःख- छगन भुजबळ

यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, सभामंडपाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहे. संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा विरोध केला गेला. हे अतिशय चुकीचे आहे. कारण नसतांना देखील विरोध केला याचं दुःख आहे. असे सांगत नाशिकची द्राक्ष आंबट नाही त्यात आता शरद सीडलेस तर खूपच गोड आहे असा टोला त्यांनी लगावला. हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. हा उत्सव संपल्यावर आपल्याला गणेशोत्सवाप्रमाणे चुकल्या चुकल्यासारखे वाटणार आहे.नाशिकला येत चला नाशिकला पुन्हा संमेलन होऊद्या अशी गळ साहित्य मंडळाला घातली. तसेच समतेची ही संस्था आपल्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. आपण परत परत नाशिकला या असे आवाहन त्यांनी साहित्यिकांना केले.

यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे संमेलनासाठी उशीर झाला. संमेलन घेणे आवश्यक असल्याने महिन्यांपूर्वी संमेलन घेणे हे ठरलं आणि रात्रंदिवस तयारी केली. यासाठी सर्वांचे हातभार लागला. यामध्ये साफसफाई कामगारांच्या विशेष योगदानाबद्दल आभार. तसेच भोजन व्यवस्था, डॉक्टर, सजावट, चित्रकार, शिल्पकार, रांगोळीकर, फुलांची सजावट, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, महापौर ,पोलीस यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, उद्योजक चांदे, निधी दिलेले सर्व आमदार, महाराष्ट्र शासन, सर्व देणगीदार, उद्योजक चंदे, बालकवी, गझलकार, साहित्यिक, मराठी साहित्य मंडळ, लोकहितवादी मंडळ, मेट भुजबळ नॉलेज सिटी, मराठी भाषा विभाग सर्व पाहुणे, प्रेक्षक, माध्यमे या सर्वांसोबत हे कसं होणार, काय होणार यावर अनेक चर्चा झाली. मात्र उपस्थिती बघितल्यावर या जागेचा निर्णय घेतला त्याबद्दल लोकहितवादी मंडळ आणि महामंडळाचे आभार यावेळी छगन भुजबळ यांनी मानले.

नाशिकच्या संमेलनाची देशातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य संमेलन म्हणून नोंद होईल – मंत्री बाळासाहेब थोरात

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजन मंत्री छगन भुजबळ यांनी अतिशय सुंदर केली आहे. हे संमेलन
नव्या तंत्रज्ञानाने हे साहित्य संमेलन जगभरात जाऊन पोहचले आहे. नाशिक मध्ये झलेलं हे संमेलन देशातील अतिशय सर्वोत्कृष्ट साहित्य संमेलन म्हणून नाशिकच्या साहित्य संमेलनाची नोंद होईल असा विश्वास मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, नाशिकच्या मातीला साहित्याचा इतिहास आहे. ज्या संत ज्ञानेश्वराणी पाया रचला त्यांचे गुरू निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वर येथे साहित्य लिहिले. त्यातून समतेचा संदेश त्यांनी यातून दिला. मराठी साहित्याची सुरुवात या ब्रम्हगिरीच्या पायथ्यापासून सुरू झाली हे विसरता येणार नाही. येथील पाण्यात आणि मातीत मुळातच साहित्य असून या भूमीतून अनेक साहित्य पुढे येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिथे चुकीच घडतंय त्या ठिकाणी साहित्यिकांनी बोललं पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर बोललं जातं तेव्हा साहित्यिकांनी गप्प बसता कामा नये. आज स्वातंत्र्यावर बोलल जातंय उद्या घटनेवर बोललं जाईल. अशा वेळी गप्प बसता येणार नाही अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला अस्वस्थता जाणवल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या वेळी राज्यघटना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळी लोकशाही व्यवस्था वाचविण्यासाठी साहित्यिकांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...