मुंबई-धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. धर्मविर दिघे आणि एकनाथ शिंदेच्या शिकवणीमुळे अजून शांत आहोत, असे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. ठाण्यात मोठ्या संख्येने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी श्रीकांत शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हे म्हणत एकनाथ शिंदे समर्थकांकडून पाठींबा दर्शवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने हातात बॅनर घेऊन शिंदे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, ”पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सर्व खासदारांना शिवसंपर्क अभियानासाठी पाठवलं. या अभियानांतर्गत आपली सत्ता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली की नाही, त्यांची काय परिस्थिती आहे. हे जाणून घेण्यासाठी पाठवलं. मी आधी परभणीला आणि नंतर साताऱ्याला गेलो. तिकडे गेल्यानंतर परिस्थिती जी ऐकली, तिथले आमदार जे म्हणाले ते मी ऐकलं. मी सामान्य कार्यकर्ता नाही तर आमदारांचा रडगाणं सांगत आहे. काय म्हणाले आमदार, आम्हाला निधी मिळत नाही. आमच्या विधानसभा क्षेत्रात भूमिपूजन हे राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. आम्हाला जर निधी मिळाला, तर ते थांबवण्याचं काम राष्ट्रवादीचे पालकमंत्री करतात. अशा परिस्थिती आम्ही काम करू शकत नाही. जर आमची सत्ता असून आम्ही लोकांना न्याय देऊन शकत नाही, तर काय फायदा अशा सत्तेचा.” संपूर्ण ठाणेकर आणि शिवसेना कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं ते म्हणाले .