मुंबई-शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर मलबजावणी संचलनालयाने धाडी टाकल्या. या कारवाईवर . आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करू अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राउत यांनी दिली आहे. ईडी असो की मग कुणीही असो, एखाद्या राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे काम करू नये असेही संजय राऊत यांनी ठणकावले आहे.
हे सरकार पुढील 4 वर्षेच नाही तर पुढची 25 वर्षे सत्तेत राहील. काहीही झाले तरी आमचे आमदार आणि नेते कुणाला शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. ईडीचा किंवा कुणाचा दबाव सरकारवर आणणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. पुढील 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे स्वप्न आता विसरूनच जा. आज जर सुरुवात तुम्ही करत असलात तरी त्याचा शेवट कसा करायचा हे आम्हाला नक्कीच माहिती आहे असा इशारा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
संजय राऊत एवढ्यातच थांबले नाहीत. पुढे जात ते म्हणाले, “ते (ईडी) ज्या लोकांचे आदेश पाळत आहेत, त्यांच्या 100 माणसांची यादी मी देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लाँड्रिंग कशा पद्धतीने चालते आणि निवडणुकीत पैसा कुठून पैसा येतो इथपासून तो कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रे सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो.”

