पुणे, 16 फेब्रुवारी 2022 : भारतातील सर्वात मोठ्या ट्रेड फायनान्स प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या ‘वायना नेटवर्क’ने आज ‘पुणे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युटर असोसिएशन’सोबत (पीसीपीडीए) भागीदारी करीत असल्याची घोषणा केली. या भागीदारीच्या माध्यमातून या भागातील अखेरच्या टप्प्यातील किरकोळ विक्रेते व वितरक यांना ‘वायना नेटवर्क’तर्फे ‘रिटेलर फायनान्सिंग प्रोग्रॅम’ देण्यात येणार आहे.
वितरक आणि किरकोळ विक्रेत्या समुदायाला आपल्यापुढील आव्हानांचा सामना करता यावा, या दृष्टीने ‘वायना नेटवर्क’चा ‘रिटेलर फायनान्सिंग प्रोग्रॅम’ तयार करण्यात आला आहे. किरकोळ विक्रेत्यांना उधारी दिल्याने किंवा कॉर्पोरेट्सशी व्यवहार करताना आगाऊ खरेदी केल्यामुळे वितरकांना अनेकदा रोकड टंचाईचे प्रश्न भेडसावतात. दुसरीकडे, किरकोळ विक्रेत्यांनाही पुरवठा-साखळी वित्तपुरवठा (एससीएफ) योजनांपासून वंचित राहावे लागते.
‘वायना नेटवर्क’च्या उत्पादनामुळे किरकोळ विक्रेत्यांना ‘पीसीपीडीए’चे सदस्य असलेल्या वितरकांमार्फत केलेल्या खरेदीसाठी वित्तपुरवठा मिळू शकेल. याव्यतिरिक्त, औपचारिक बँकिंग प्रणालीचा भाग बनण्याची आणि परवडणाऱ्या दरात निधी मिळवण्याची संधीही किरकोळ विक्रेत्यांना यातून मिळेल. किरकोळ विक्रेत्यांनी सादर केलेले ‘जीएसटी रिटर्न्स’ किंवा त्यांचे लेजर यांतील माहितीवरून मिळवलेल्या त्यांच्या ऐतिहासिक व्यापारी डेटाच्या आधारावर हे उत्पादन त्यांना ऑफर केले जाईल.
या भागीदारीबद्दल बोलताना, ‘वायना नेटवर्क’चे व्यवसाय प्रमुख जितिन नंदा म्हणाले, “सर्वात लहान व्यावसायिकांपर्यंत पोहोचून, त्यांची सर्वात मोठ्या वित्तपुरवठादारांशी गाठ घालून देऊन, पुरवठा साखळीतील व्यवसायांचे एकूण उत्पादन (जीडीपी) वाढविण्याचे वायना नेटवर्कचे धोरण आहे. त्या अनुषंगाने हा प्रोग्रॅम आखण्यात आला आहे. ‘वायना नेटवर्क’च्या मालकीच्या तंत्रज्ञानामुळे, एफएमसीजी व्यवसायाच्या पुरवठा साखळीतील अत्यंत महत्त्वूर्ण घटक असणाऱ्या एससीएफना अखेरच्या टप्प्यातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत विस्तार करणे शक्य झाले आहे. ‘पीसीपीडीए’सोबत भागीदारी करून आम्ही किरकोळ विक्रेते व वितरक यांना अखेरच्या टप्प्यातील ‘रिटेलर फायनान्स सोल्यूशन्स’ त्वरीत उपलब्ध करून देणार आहोत. त्यातून पुरवठा साखळीतील सर्व भागधारकांची विक्री व उलाढाल यांच्यात वाढ होऊ शकेल.”
‘वायना नेटवर्क’सोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना ‘पीसीपीडीए’चे अध्यक्ष आनंद मुनोत म्हणाले, “वितरक व किरकोळ विक्रेते हा समुदाय मुख्यत्वे पारंपरिक व्यवसाय विभागात मोडतो. या समुदायाला अनेकदा परवडणाऱ्या दरातील खेळत्या भांडवलाची गरज असते व ते न मिळाल्याने त्यांना अनेक आव्हानांना दीर्घकाळ सामोरे जावे लागते. वस्तुस्थिती अशी आहे की व्यावसायिक कर्जे स्थिर मालमत्तेवर दिली जातात आणि किरकोळ विक्रेते किंवा किराणा स्टोअर यांच्याकडे अशा मालमत्ता अस्तित्वात नसतात; तथापि या व्यवसायाची परिस्थिती वेगाने विकसित होत आहे आणि एमएसएमई क्षेत्रासाठी वाढीच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, अशा नेमक्या वेळी आम्ही ‘वायना नेटवर्क’सोबत भागीदारी करीत आहोत. यातून आमचे वितरक व किरकोळ विक्रेत्यांचे नेटवर्क वाढेल, त्यांच्या व्यवसायात वाढ होईल आणि त्यांची बाजारात पत निर्माण होईल, अशी आम्हाला आशा आहे.”
‘वायना नेटवर्क’विषयी –
वायना नेटवर्क हा भारतातील सर्वात मोठ्या सप्लाय चेन फायनान्स प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. 25 प्रकारच्या विविध क्षेत्रांमधील 1000 पुरवठा साखळींमध्ये 50,000 एमएसएमईंना 10 अब्ज डॉलर्सचा वित्तपुरवठा या कंपनीने मिळवून दिला आहे. कॉर्पोरेट्स आणि त्यांच्या व्यापार परिसंस्थांना त्यांच्या देय रकमा व प्राप्त करण्याच्या रकमा यांच्यासाठी डिजिटल स्वरुपाचा, सोयीस्कर पद्धतीचा आणि परवडणाऱ्या स्वरुपाचा पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात वायना कार्यरत आहे. आपल्या स्वतःच्या मालकीच्या तंत्रज्ञानासह, ‘वायना’ने आजवर 20 लाखांहून अधिक व्यवहार पार पाडले आहेत आणि ग्राहकांना ‘शून्य-बदला’चा अनुभव दिला आहे. हे नेटवर्क आज भारतातील 600 शहरांमध्ये आणि 1150हून अधिक पिन कोड क्षेत्रांमध्ये पसरले आहे, तसेच जगभरातील 20 देशांमध्येही त्याचा विस्तार झालेला आहे. ही कंपनी पुरवठा साखळीच्या अखेरच्या टप्प्यात येणाऱ्या सर्वात लहान एमएसएमईंना वाढत्या प्रमाणात सेवा पुरवीत आहे. अनेक कॉर्पोरेट्स आणि लाखो एसएमईं यांना जीएसटी, ई-वे बिल आणि ई-इनव्हॉइस सुविधा देणारी वायना ही देशातील सर्वात मोठी जीएसपी (जीएसटी सुविधा प्रदाता) आहे. या जीएसपी प्लॅटफॉर्मवर जीएसटी व ई-इनव्हॉइसिंग यांचे 2.5 अब्जांपेक्षा जास्त ‘एपीआय कॉल्स’ ‘झीरो डाउनटाइम’मध्ये हाताळण्यात आले आहेत. ही कंपनी सुरू झाल्यापासून 5 पैकी 1 ई-इनव्हॉइस या कंपनीच्या माध्यमातून व्युत्पन्न झालेला आहे. प्रत्येक व्यवसायासाठी पुरवठा साखळी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ‘वायना’ने बाळगले आहे. या कामगिरीमुळेच ‘वायना’ला गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ येथे ‘आयटीएफएस प्लॅटफॉर्म’ स्थापन करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे.

