पुणे : दौंड, इंदापूर नगरपालिका, दौंड हवेली, इंदापूर तालुक्यातील कालव्याशेजारील असणारी गावे आणि जनाई उपसा सिंचन योजनेस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी येत्या पाच तारखेपासून खडकवासला धरणातून 1.60 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हास्तरीय पाणी नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पाणी नियोजन बैठक झाली. बैठकीला पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार सर्वश्री बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, ॲड. राहुल कुल, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
बैठकीत जलसंपदा विभागातर्फे उपलब्ध पाणी आणि त्यानुसार करण्यात आलेले नियोजन यांचे श्री. बापट यांना सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर दौंड, इंदापूर तालुक्यातील कालव्याशेजारील गावे आणि नगरपालिका यांना पिण्यासाठी 5 फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात यावे. त्यासाठी जलसंपदा विभाग, महसूल व वीज वितरण कंपनी आणि पोलीस अधिकारी यांनी आवश्यक ती तयारी करावी असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत चासकमान प्रकल्पातून सिंचनासाठीचे रब्बीचे दुसरे आवर्तन पाच फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन देण्यात यावे, असा निर्णय घेतला गेला. मात्र पिण्याच्या पाण्याचे आवर्तनाचे नियोजन स्थानिक लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी एकत्रित बसून करावे, अशा सूचना श्री. बापट यांनी दिल्या.
पुणे महानगरपालिकेला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात बचत करता येणे शक्य आहे. त्यासाठी खडकवासला धरणातून पुरवठा करणाऱ्या कालव्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याचे नियोजन महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने करावे, असेही त्यांनी सांगितले. यंदा पाण्याची टंचाई अभूतपूर्व अशी आहे. त्यामुळे अतिशय काटकसरीने पाणी वापरण्याची गरज आहे. एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाला पुणेकरांनी साथ दिली आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी आणि आणखी पाणी बचत करण्यासाठी पुणेकर यापुढेही सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी बैठकीत व्यक्त केला. त्यासाठी कालवा पाहणी व महापालिकेत विशेष बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विविध उपाययोजना आणि पाणी गळती रोखून बचत झाल्यासच पुन्हा दौंड आणि इंदापूरसाठीचे दुसरे आवर्तन देणे शक्य होईल, असे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी बैठकीत स्पष्ट केले. बैठकीस खडकवासला प्रकल्पाचे अभियंता लोहार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते

