पुणे – भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुणे महापालिकेत झालेला हल्ला मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून झालाय का? याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत भूमिका मांडली आहे. चित्रा वाघ यांनी, ‘जनतेसमोर शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पाडणा-या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केलाय इथं लोकशाही नव्हे ठोकशाही सुरूहे.. मुख्यमंत्री तर शेतीतलं बुजगावणं बनून राहीलेत माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून शिवसैनिकांनी हल्ला केलाय का याचा तपास व्हायला पाहीजे.’ अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, सोमय्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला असून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे.
आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फडणवीस यांनी याबाबत भूमिका मांडताना, ‘राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!’ असं ट्विट केलं.

