पुणे (शरद लोणकर) – भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ५० वर्षातले पुणे आणि अलीकडच्या ५ वर्षातले पुणे…असा एक विषय आता चर्चेला आणला आहे. हा विषय खरोखरच खूप महत्वपूर्ण आणि वैचारिक मंथन करायला लावणारा,आणि पुण्याचे आजचे स्वरूप आणि जुन्या पुण्याचे स्वरूप यात होत गेलेल्या बदलाबाबत चिंतन करायला लावणारा आहे. अर्थात चंद्रकांत दादांनी हा विषय जरी राजकीय दृष्ट्या छेडला असला तरी राजकीय पातळीवरून त्याबाबत त्याची राजकीय चर्चाही होईल.पण जुन्या पुण्यातली मंडळी मात्र ‘आमचे जुने पुणे च शानदार होते.आता मात्र बजबजपुरी झालीये अशीच उत्तरे देताना दिसतील.
खरे तर बीआरटी आली तेव्हा मोठमोठी सुंदर छायाचित्रे दाखवून,स्वप्ने दाखवून बीआरटी आणली गेली. जी आजही नुसती फेल गेली एवढेच म्हणता येणार नाही तर हीच बीआरटी पुण्याच्या वाहतुकीचा बट्ट्या बोळ करण्याचे एक कारणही ठरली.सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या नावाखाली जी आणली गेली होती. याच बीआरटी ने पुणे महापालिकेची सत्ता हि उलथाविली हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे .
मूळ विषय आहे तो ५० वर्षातल्या किंवा भाजपाची सत्ता येण्यापूर्वीच्या पुण्याचा.आणि सत्ता आल्यानंतरच्या पुण्याचा.जुनं पुणं टांगेवाल्यांचे, पेन्शरांचे पुणे..,आता गणेशोत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची स्थापना होते तिथे असलेल्या कोतवाल चावडी सारख्या ऐतिहासिक खुणांचे पुणे. पहाटेपहाटे..प्र..भा..त..अशी आरोळी येणारे आणि सायंकाळी..संध्या ची वाट पाहणारे पुणे.पेशवे उद्यानात फुलराणीत बागडणाऱ्या,आणि हत्ती सिंह पाहून बागडणाऱ्या बाल चमूंचे पुणे,फुगेवाडीच्या जकात नाक्या पासून,सातारा रस्त्यावरील आताच्या पंचमी हॉटेल जवळील जकात नाक्यापर्यंत चे ,आणि शेवाळवाडीच्या जकात नाक्यापासून ते सिंहगड रस्त्यावरील आताच्या लोकमत ऑफिस जवळील जकात नाक्यापर्यंत चे पुणे ,व्यापाऱ्यांना टिम्बर मार्केट ते मार्केट यार्ड सारख्या जागा वास्तू देणारे पुणे,दुतर्फा भल्या मोठ्या झाडी असलेल्या जंगली महाराज रस्ता ,विद्यापीठ रस्ता ,फर्ग्युसन रस्ता, आणि मध्यावर असलेले भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, टीळक स्मारक मंदिर अशा सांस्कृतिक रंगात रंगलेले पुणे त्या पुण्यातही काही उणे नव्हते. नंतर कोतवाल चावडी हटविली गेली,लाल महाल उभारला गेला, अनेक ठिकाणी नाट्यगृहे जशी यशवंतराव चव्हाण ,अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले अशी नाट्यगृहे उभारली गेली.गणेश कला क्रीडा मंच उभारले गेले, बालेवाडी चे स्टेडियम उभारले गेले.गंज पेठेत महात्मा फुले स्मारक उभारले गेले. अगदी २००० सालापर्यंत पेशवेकालीन भुयारी यंत्रणेतील पाणी पुरवठा यंत्रणेचे पाणी हि वापरले जात होते. टांगे गेले , रिक्षा आल्या,सायकली गेल्या,टू व्हीलर आल्या.पण पुणे ठीक होते.सदाशिव पेठेत राहणारी मंडळी हि सुखात राहत होती.मगरपट्टा बहरला, औंध बाणेर आयटी पार्क आले.
पण पुण्याचे वाट्टोळे व्हायला सुरुवात झाली ती..महापालिकेच्या हद्दी वाढविण्याच्या निर्णयांनी..आणि पोटापाण्यासाठी आलेल्या लोंढ्यांनी हे शहर व्यापले,महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावात राजकारण्यांनीच असंख्य जागा,मग त्या सरकारी असो वा अन्य कुठल्याही असो..या जागा बळकावून त्यावर बिल्डिंगा बांधून त्यांचा धंदा मांडला,या धंद्यातून त्यांनी पैसा मिळविला आणि राजकरणात भरारी घेऊ लागले ,आणि पुण्याची बजबजपुरी व्हायला येथूनच सुरुवात झाली. महापालिकेच्या हद्दीला ना लगाम कोणी ठेवला ,हद्द वाढविण्याचा हा घोडा जसा बेफाम सुटला तशी बजबजपुरी बेफाम वाढत गेली. त्यावर कडी म्हणून..जरी गरीब पोटापाण्यासाठी राबणाऱ्याच्या नावाखाली गुंठेवारी आणून या राजकारणी बिल्डरांना आणखी प्रोत्साहन दिले गेले. आणि टू व्हीलर नाही तर नौकरी नाही, काम धंदा नाही असे घोषवाक्य बनलेल्या या शहरात वाहतुकीच्या समस्येने उग्र रूप धारण केले. कात्रज सारख्या ठिकाणी जिथे कधी काळी कात्रज च्या तलावालगत जंगल होते, अगदी रानगव्यांचा जिथे वावर होता आणि जिथे याच महापालिकेने एक रान गवा पकडला देखील होता,तिथे चक्क मोठ मोठ्या इमारती उभ्या करून करोडो अब्जावधींचा धंदा केला गेला .जंगल, नाले नकाशावरून गायब केली गेली .आणि उभे केले गेले कॉंक्रिटचे साम्राज्य…जिथे रस्ते नाहीत, पाणी नाहीत तिथे आडवी तिडवी कॉंक्रीटच्या साम्राज्ये राजकारणी बिल्डरांच्या तुंबड्या तर भरत गेली पण पुण्याची तेवढीच वाट लावत गेली.
आता या ५ वर्षात जरी इथे भाजपची सत्ता आली असली तरी हि सत्ता हि त्याला लगाम घालू शकलेली नाही हे वास्तव आहे, मेट्रो येईल पण तरीही इथल्या वाहतुकीचा अजगराला पायबंद घालतां येईलच याची शाश्वती नाही.जोवर महापालिकेच्या हद्दीला लगाम घालता येत नाही आणि नव्या गावाचे नियोजन करण्यापूर्वी तिथे रस्ते, पायाभूत सोयी सुविधा होण्यापूर्वीच बांधकामांचा राक्षस हैदोस मांडेल अशा पुण्याच्या बजबजपुरीला रोखण्यासाठी काही उपाय योजना कोणी केलेली नाही या वास्तवाकडे जोवर दुर्लक्ष होत राहील तोवर तरी जुने पुणेच होते सोने असेच म्हणावे लागेल.

