पुणे- पुणे तिथे काही नाही उणे इथे ‘दस मे बस ‘सारख्या उथळ योजनांचे बोजवारे तर उडालेच आता बस थांबे -म्हणजे बस स्टॉपच उखडून पडू लागले आहेत . नवनव्या इलेक्ट्रोनिक बसेस खरेदी करणाऱ्या , गेली अनेक वर्षे आपल्या स्मार्ट पुण्याची स्वप्ने पाहणाऱ्या , आणि आता भाजपाची जान बनू पहाणारी मेट्रो अंगणी आली असताना असाच एक बस स्टॉप चक्क शिवसैनिकाच्या अंगावर कोसळला आहे .
याबाबत शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे , महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी संताप व्यक्त करत प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएल बस स्टॉपस ची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. अनेक बस स्टॉप हे जीर्ण अवस्थेत असून याबद्दल अनेक वेळा तक्रारीही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आज रोजी 17/8 /2022 दुपारी पुणे कॅम्प भागामध्ये जीर्ण अवस्थेतला बस स्टॉप देवेंद्र शिंदे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख यांच्या अंगावर पडून मोठा अपघात झाला. शिंदे गंभीर जखमी झाले असून याची पूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या पीएमपीएलची आहे.

पुणे महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून प्रसिद्धीसाठी वेगवेगळे बोर्ड बॅनर करून दस मे बस अशी मोठ्या जाहिराती करून बसेस चालवून पुणेकरांना फसवण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु याच प्रवाशांना उभे राहण्यास एकही धड बसस्टाॅप नाही. पुण्यातील सर्व बसस्टॉप हे जीर्णावस्थेत आहेत. याकडे भाजप सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. बस स्टॉपच्या माध्यमातून अनेक एडवर्टाइजमेंट कंपनीच्या जाहिराती बस स्टॉपवर लावल्या जातात. त्याच्यातून पी एम पी एल ला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. तरीदेखील पुण्यातील बस स्टॉप दुरुस्त केले जात नाही. अशा जीर्णावस्थेतील बस स्टॉपची दुरुस्ती केली नाही तर अशा दुर्देवी दुर्घटना अनेक जागी घडू शकतात. पुणे शहरातील प्रत्येक बस स्टॉपचे थर्ड पार्टी ऑडिट करणे आवश्यक आहे. तसेच बस स्टॉपवरील जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे ही ऑडिट करणे गरजेचे आहे. पुणे कॅम्प या भागांमध्ये दुर्घटना झाली त्या बस स्टॉप च्या जवळ आणखीन एक बस स्टॉप आहे तो देखील जीर्ण अवस्थेत आहे तेथेही अपघात होऊ शकतो पी एम पी एल लवकरात लवकर पुण्यातील सर्व बसस्टॉप चे ऑडिट करून दुरुस्तीचे काम केले नाही तर शिवसेना पुणे शहराच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व यापुढे अशी दुर्घटना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी पीएमपीएल यांची व सत्ताधारी भाजपाची राहील. कारण आर्थिक उत्पन्न मिळवून देणार्या बस स्टॉपकडे त्यांचं दुर्लक्ष असून ते पुणेकर नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. अशा झोपलेल्या प्रशासनाला व सत्तधार्यांना शिवसेना आपल्या उग्र आंदोलनातून जागे करेन याची नोंद पीएमपीएलच्या अधिकारी वर्गाने घ्यावी.

