पुणे : संगमरवर दगडामध्ये काही वेळा दोष असतो त्यामुळे इटालियन मार्बल शिल्पकार पसंत करतात. चित्र,शिल्प यामध्ये चेहऱ्यावर जसे हवे तसे भाव करता यायला पाहिजेत, हे काम कठीण आहे. जशीच्या तशी मूर्ती तयार करणे ही शिल्पकाराच्या बोटातील जादू असते. त्यात प्रमाणबद्ध मूर्ती करणे हे शिल्पकारासाठी आव्हान असते, असे मत ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
गौरव परंपरेचा सन्मान शिल्पकाराचा या कार्यक्रमांतर्गत शाहीर चेतन रवींद्र हिंगे गौरव समितीतर्फे शाहीर व शिल्पकार चेतन रवींद्र हिंगे यांचा विशेष सन्मान लालमहाल येथे करण्यात आला. चेतन हिंगे यांनी घडवलेल्या श्रीक्षेत्र देहूतील शिळा मंदिरातील जगद्गुरु तुकाराम महाराज मूर्तीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या विशेष कामगिरीबद्दल शाहीर चेतन हिंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे यावेळी उपस्थित होते. मानाचा फेटा, मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, दोन फुटी मूर्ती करणे हे आवाक्यात असते, परंतु चार फुटी मूर्ती करणे हे तुलनेने अवघड असते. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहता यायला हवे. संत तुकारामांचे अभंगातून उत्कट झालेले रूप मूर्तीत आणणे हे कठीण काम आहे. ते हिंगे यांनी उत्तमप्रकारे केले आहे.
चेतन हिंगे म्हणाले, संत तुकाराम यांची मूर्ती बनविण्याचे भाग्य मला मिळाले. घरातील शिल्पकला व शाहिरीचा वारसा जपण्याचा मी प्रयत्न करतोय. चार पिढ्यांपूर्वी आम्ही आळंदीमध्ये पारावर मूर्ती घडविली होती, आता थेट देहूमध्ये मंदिरातील गाभाऱ्यात शिल्पकलेची सेवा दिली. सन २०२१ साली वटपौर्णिमेच्या दिवशी शिल्प करण्यास सुरुवात केली, तर, २०२२ च्या वटपौर्णिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिल्पाचे लोकार्पण झाले. चार फूट आकाराची ही मूर्ती आहे. राजस्थानमध्ये वीस दिवस विविध खाणींमध्ये जाऊन योग्य दगड शोधला. दगडाचे परीक्षण करून पुढचे काम पुण्यात केले. साडे चार टन वजनाच्या दगडात काम करून दीड ते सव्वादोन टन दगड वापरून आत्ताची मूर्ती केली आहे, असेही त्यांनी सांगितले. शाहीर हेमंत मावळे यांनी प्रास्ताविक केले. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.

