सुदर्शन मित्र मंडळ व फर्ग्युसन रोड नागरी व्यापारी संघटनेतर्फे ममता फाऊंडेशनला १०० किलो धान्य व खाद्यपदार्थ
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाला जनआंदोलनांची मोठी परंपरा आहे. सद्य:स्थितीत प्रबोधनाच्या कार्यासाठी, गणेश मंडळांचे व्यासपीठ उपयुक्त ठरत आहे. अनेक गणेश मंडळांकडून बाप्पाचा प्रसादरुपी असलेले साहित्य व धान्य सामाजिक संस्थांना पोहोचविण्याचे काम केले जात आहे. असाच सहभाग गणेश मंडळांनी सामाजिक कार्यात घ्यायला हवा. तसेच त्या कार्यात सातत्य देखील राखायला हवे. यामुळे वंचितांना आधार देताना, मंडळांची प्रतिमा सुद्धा उजळते आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते व गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी व्यक्त केले.
सुदर्शन मित्र मंडळ संस्था आणि फर्ग्युसन रोड नागरी व्यापारी संघटनेतर्फे ममता फाऊंडेशन या संस्थेला १०० किलो धान्य व खाद्यपदार्थांची भेट देण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, युवा भारतीचे अध्यक्ष रामदास मारणे, व्यापारी संघटनेचे संदीप कुदळे, हर्षद वैद्य, कमलेश यादव, मंडळाचे अध्यक्ष शाम मारणे, दत्ता वाळके, अमर शर्मा, अभिजीत धुमाळ, सतीश पिल्ले, ॠषिकेश कोंढाळकर, मयुर उत्तेकर, निखील बटवाल, सागर शिंदे, शेखर यादव, तुषार पाटील, उदय पुरंदरे, इमरान शेख, दिलीप चव्हाण, निलेश धुमाळ आदी उपस्थित होते. संदीप कुदळे यांनी त्यांची मुलगी आर्या कुदळे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद सराफ यांच्या संस्थेला ५ हजार रुपयांची देणगी दिली.
आनंद सराफ म्हणाले, जीवन सुंदर आहे, त्याला आपण आणखी सुंदर करायला हवे, असा संदेश सामाजिक संस्थांतून दिला जातो. नैराश्याच्या वाटेने न जाता आनंदमय प्रकाशाच्या वाटेने जाण्याकरीता संस्थेतील मुलांना शिकविले जाते. त्याला गणेश मंडळांचा देखील आता हातभार लागत आहे.
प्रा.ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, सत्कार समारंभ, भोजनाचे कार्यक्रम हे आप्त-स्वकियांमध्ये मोठया प्रमाणात केले जातात. मात्र, एखाद्या सामाजिक संस्थेला मदत देण्याकरीता मोठे मन लागते. आपल्या आजूबाजूला अनेक गरजू संस्था व नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना मदत करणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे. सत्कार आणि भोजन समारंभांपेक्षा सामाजिक संस्थांना मदत देणे, हे मोलाचे कार्य आहे, असेही त्यांनी सांगितले. संदीप कुदळे यांनी सूत्रसंचालन केले.

