पुणे : महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्यावतीने 41 व्या ज्युनिअर नॅशनल रोइंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. दिनांक 9 ते 12 डिसेंबर दरम्यान सीएमई येथील आर्मी रोइंग नोड येथे ही स्पर्धा होणार आहे. देशभरातली 21 राज्यांचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे सचिव संजय वळवी, उपाध्यक्ष नरेन कोठारी, आर.आर. देशपांडे उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन 9 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता महापौर माई ढोरे यांच्या हस्ते होणार आहे.
संजय वळवी म्हणाले, कोविडनंतर महाराष्ट्र रोइंग असोसिएशनच्या वतीने प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. 18 वर्षाखालील वयोगटात स्पर्धा होणार असून सिंगल स्कलर, डबल स्कलर, पेअर आणि फोर स्कलरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. सकाळी 8 ते 12 च्या दरम्यान तीन दिवस या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 12 डिसेंबर रोजी होणार आहे.
नरेन कोठारी म्हणाले, या स्पर्धेसोबतच वरिष्ठ गट राज्यस्तरीय रोइंग स्पर्धा 4 ते 7 डिसेंबर रोजी होणार आहे. 3 ते 9 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी देखील या स्पर्धेतून होईल.

