पुणे, २३ जानेवारी २०१७ – दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या ‘विश्वकर्मा विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल’ या पुण्यातील ख्यातनाम शाळेची केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील नीती आयोगातर्फे अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज स्थापन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पात सहभागासाठी भारतभरातून एकूण १३००५ अर्ज आले होते. त्यापैकी ५९७ शाळांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आणि अखेर २५७ शाळा निवडल्या गेल्या. यामध्ये महाराष्ट्रातील २७ व पुण्यातील ७ शाळांची निवड झाली आहे.
विश्वकर्मा विद्यालयातील शिक्षक कै. सौ. दुर्गेश राठोड, शीला सावळसुरे व सौ. मृणाल देशपांडे यांनी अमन सिंग, साक्षी सिंग व अथर्व यान्ना या विद्यार्थ्यांसमवेत घनकचरा व्यवस्थापन (सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट) व वाहतूक समस्यांवर उपाय अशा दोन प्रकल्पांवर काम केले. विद्यार्थ्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि सक्रिय प्रारुपांद्वारे हे प्रकल्प गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर केले. या प्रकल्पांची परीक्षकांनी प्रशंसा केली होती. निवड झालेल्या शाळांना सरकारने २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. अटल टिंकर लॅबोरेटरी स्थापन करण्यासाठी विश्वकर्मा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने १८०० चौरस फूट जागा दिली आहे.
निधी मिळाल्यापासून सहा महिन्यांच्या आत या प्रयोगशाळा स्थापन करायच्या आहेत. विश्वकर्मा विद्यालयाचा संघ तज्ज्ञांच्या सहकार्याने कार्यशाळा, विज्ञान मेळावे, सायन्स क्लब्ज, विविध स्पर्धांचे आयोजन करणार असून कल्पक विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील बुद्धिमत्ता शोधासाठी व्यासपीठ मिळवून देणार आहे. पुण्यातील सर्व शाळांतील उत्साही विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळा उपलब्ध करुन दिल्या जातील.
यासंदर्भात अभिमान व्यक्त करताना विश्वकर्मा विद्यालयाच्या अध्यक्ष सौ. तृप्ती भरत आगरवाल म्हणाल्या, की आमचे विद्यालय केवळ या प्रयोगशाळाच स्थापन करणार नसून विद्यार्थ्यांमधून असे युवा शास्त्रज्ञ घडवण्याचे उद्दिष्ट्य ठेवणार आहे, जे समाजाला निश्चिपणे मदत करतील आणि देशाला विकासाच्या मार्गावर यशस्वी करतील.