‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘ मध्ये रंगली विष्णू मनोहर यांची प्रकट मुलाखत !
पुणे :
अभिनयाचे वेड ते पाककला ,पुस्तक लिखाण ते पाक कलेचा विश्वविक्रम , अविश्रांत भ्रमंती ते स्वतःचे पर्यावरणपूरक घर आणि नाना पाटेकर यांच्या आवाजातील नट सम्राट स्वगत ते स्वतः रचलेले ‘पाक सम्राट’ असे स्वगत येथे सलाम पुणे पुरस्कार विजेते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सादर करीत जीवनातल्या अनेक अनुभवांचे कथन येथे केले आणि या रम्य सायंकाळी पुणेकर रंगून गेले !
‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘ आयोजित विष्णू मनोहर यांच्या प्रकट मुलाखतीचां कार्यक्रम संपन्न झाला . कोथरूड च्या गांधीभवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रा . उज्वला बर्वे यांनी ही प्रकट मुलाखत घेतली . आणि ती उत्तरोत्तर रंगत गेली . अध्यक्ष स्थानी ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘चे अध्यक्ष गणेश जाधव होते .
‘खाद्य जगत खूप मोठे आहे .येथे सतत नवीन शिकत राहावे लागते .आपण मास्टर झालो ,असे म्ह्णून चालत नाही . कामावर निष्ठा ठेवली आणि आवडीने ते केले की यश मिळते अन्यथा अनिच्छेने केलेला चहाही चांगला होत नाही ,असा आपला अनुभव आहे . आपल्या कामावर श्रद्धा ठेवली की परमेश्वर पण प्रसन्न होतो ‘ असे विष्णू मनोहर यांनी सांगितले .
सुरुवातीला आपल्याला कोणते खाद्यपदार्थ करता येत होते ? या प्रश्नाला उत्तर देताना विष्णू मनोहर म्हणाले ,’सिनेमात काम करायला जाताना खिशात पैसे असावेत ,स्वतःची गाडी असावी म्हणून मी केटरिंग कडे वळलो . सुरुवातीला मला फोडणीची पोळी सोडले तर काही येत नव्हते .
दूरचित्रवाणीवरील ‘मेजवानी ‘ या ‘कुकरी शो ‘ ची सुरुवात कशी झाली ? या प्रश्नावर विष्णू मनोहर यांनी अभिनय ते कुकरी शो असा प्रवास उलगडून सांगितला . ‘अभिनयासाठी एका मालिकेत छोटी भूमिका करायला गेलेलो असताना ई -टीव्ही च्या अधिकाऱ्यांनी माझ्या बाबत विचारणा केली आणि मी शेफ आहे ,असे कळल्यावर मला ‘मेजवानी ‘ या शो साठी निवडले . पुढे १४ वर्षे हा कार्यक्रम चालला ! मग साडे तीन हजार हून अधिक जाहीर कार्यक्रम केले . ४५ पुस्तके लिहिली .१७ पुस्तके येत आहेत . राज्य सरकारच्या साडेचार हजार रेसिपी असलेल्या खाद्य संस्कृती कोषासाठी काम केले .
‘विष्णू की रसोई ‘ मागील कल्पना सांगताना ते म्हणाले ,’ रेस्टोरंट मध्ये गेल्यावर ऑर्डर आणि खिशातील पैसे याचा मेळ बसत नाही . म्हणून एकदाच पैसे द्या आणि हवे ते ,हवे तितके खा ,असा दिलासा देणारे हॉटेल काढायचे मनात होते . त्यातून ‘विष्णू की रसोई ‘ चा प्रारंभ झाला . आता इंदोर येथेही ती सुरु होत आहे .
‘विश्वविक्रमासाठी ५३ तास सलग पाककृती करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता ,आणि तो पूर्ण होताना ९३ वर्षांच्या वडिलांनी पाहिले , असे सांगून आगामी उपक्रमांबद्दल विष्णू मनोहर यांनी माहिती दिली . त्यांच्या दुहेरी भूमिकेसह चित्रपट सप्टेंबर मध्ये येत आहे . ‘मराठीतील बाहुबली ‘ अशी कल्पना असलेला या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी यांनी पुरुष भूमिका केली असून नृत्यरचना चिन्नी प्रकाश यांच्या आहेत .
पंचतारांकित हॉटेल च्या व्यवसायातही पदार्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
घरात कोण स्वयंपाक करते ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले ‘घरातील स्वयंपाक पत्नीच करते ,
नातेवाईकांच्या वाढदिवसाला मात्र मी किमान एक पदार्थ आवर्जून करतो ‘.शेफ असलो तरी मी शेफ़ारलेलो नाही असेही त्यांनी सांगितले
पहिला जाहीर कार्यक्रम रोटरी क्लब च्या व्यासपीठावरच झाला होता ,असे सांगून त्यांनी रोटरी चे आभार मानले . ‘नट सम्राट ‘ च्या ‘जगावे की मरावे ‘ या स्वगताच्या धर्तीवर ‘खावे की खाऊ नये ‘ हे स्वगत सादर करून त्यांनी वाहवा मिळवली .
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन ‘ चे अध्यक्ष गणेश जाधव यांनी स्वागत केले .

