मुंबई दि. १३ ऑगस्ट – ज्या जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध अद्याप कडक आहेत, अशा बीडमध्ये शिवसेनेच्या युवा सेनेकडून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नियमांचा आता त्यांनाच विसर पडला का? कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहेत का? सत्ताधारी शिवसेनेला नियम नाहीत का? युवा सेनेच्या पदाढीकाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देणार का? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या बीडमध्ये शिवसेनेच्या युवा संवाद दौऱ्यात प्रचंड गर्दी होती. यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, मेळाव्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत, मास्कचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री जनतेला कोरोना परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन करतात. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील युवा सेनेचे पदाधिकारी नियम भंग करत असतील तर हे दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये एका पक्षासाठी एक नियम आणि दुसऱ्या पक्षासाठी वेगळे नियम आहेत का? कायदा सगळ्यांना समान असतो. त्यामुळे या मेळाव्यातील नियमभंगाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले, मी आणि मंगल प्रभात लोढा यांनी सायन हॉस्पिटलच्या वैद्यकीय दुरवस्थेसंदर्भात आंदोलन केले त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. ममता बॅनर्जींच्या हिंसाचाराच्या विरोधात बीडमध्ये भाजपाने आंदोलन केले. तेव्हा १० जणांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून आंदोलन केले, तरीदेखील माझ्यावर गुन्हा दाखल केला, याचीही दरेकर यांनी आठवण करून देत आता मुख्यमंत्री युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

