मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही विनायक मेटेंबद्दल भावना व्यक्त केल्या.मराठा समाजातील बांधवांना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे; ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो, अशा शोकभावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.विनायकरावांना गेली अनेक वर्षे जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची. भाजपसोबत असताना त्यांची गोपीनाथरावांसोबत सतत भेट व्हायची. आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे. त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह, धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे. अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे, त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Date: