पुणे : कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन अशी भाजपाची सर्व टीम पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष गेली होती. पूरग्रस्तांच्या पूनर्वसनाचे आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे काम फडणवीस सरकारने आणि भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. गिरीश महाजन पाण्यात उतरुन पूरग्रस्तांच्या मदतीला गेले. याऊलट राज ठाकरे फक्त घरात बसून किंवा सभांमधून बोलतात, टीका करतात. सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज ठाकरे गेल्याचे दिसले नाही. त्यामुळे यासंदर्भात टीका करण्याचा राज ठाकरे यांना नैतिक अधिकारच नाही, अशा खरमरीत शब्दांत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
रेश्माताई भोसले मित्र परिवाराच्या वतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात खासदार संजय काकडे बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका रेश्मा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची घोडदौड सुरू आहे. मुंबईसह पुणे व नागपूरमध्ये 350 किलोमीटर पेक्षा अधिक मेट्रो प्रकल्प, पाणी व शेती विकास, महिला सबलीकरण, आरोग्य, उद्योग अशा सर्व क्षेत्रात गतीने विकास प्रकल्प फडणवीस सरकारने राबविले. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात फडणवीस सरकार येण्यासाठी सिद्धार्थ शिरोळे यांना निवडून द्या, असे आवाहन खासदार संजय काकडे यांनी आज केले.
शिरोळे घराणं हे भाजपशी एकनिष्ठ आहे. अनिल शिरोळे यांचे नाव पुणे लोकसभासाठी अंतिम झालेले असतानाही पक्षाने घेतलेला निर्णय त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता मान्य केला. त्यामुळे अशा एकनिष्ठ असलेल्या घराण्यातील सिद्धार्थ शिरोळे यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून देण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असेही खासदार काकडे म्हणाले.
राज यांना आता फक्त पेपर वाचायचं काम राहील! – खा. काकडे
राज ठाकरे यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. घरात बसून बोलण्यामुळे व सभांमधून फक्त टीका करण्यामुळे महाराष्ट्रातील कोणीच त्यांना गांभिर्याने घेत नाही. विकासात्मक धोरण आणि संघटनात्मक काम नसल्यानेच राज ठाकरे यांना माणसं सोडून जात आहेत. मागच्यावेळी त्यांचा एक आमदार निवडून आला. तोही त्याच्या स्वतःच्या कामामुळे आणि तोही नंतर शिवसेनेत गेला. यावेळी तर, त्यांचा एकही आमदार निवडून येईल असे वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना या निवडणुकीनंतर फक्त पेपर वाचण्याचेच काम शिल्लक राहील, असा चिमटाही खासदार संजय काकडे यांनी राज यांना काढला.



