मुंबई- आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. त्यानंतर आता भाजप-शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत महायुतीची औपचारिक घोषणा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
बंडखोरांना जागा दाखवून देऊ-पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युती होईल का? असा इतरांना प्रश्न पडत होता, आमच्या मनात हा प्रश्न कधीच आला नाही. युतीच्या फॉरम्यूल्यावर बोलताना ते म्हणाले की, एकत्र रहायचे असेल तर कधी-कधी तडजोडी कराव्या लागतात. महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल आणि मुंबईतून आदित्य ठाकरे सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वस यावेळी त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडाची तलवार काढली आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करु. पण, तरीही कोणी बंडखोरीवर ठाम असेल तर महायुती पूर्ण ताकदीने लढेल. यावेळी अनेक दिग्गजांची तिकीट कापली, त्यावर विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, तिकीटं कापली म्हणणे योग्य नाही, त्यांना दुसरी जबाबदारी देण्यात येईल.