पुणे – गाण्यांचा दणदणाट नाही की बँड, ढोलताशाचा आवाज नाही. मंजूळ सनईचे स्वर, वेदमंत्रांचा घोष, ब्रह्मस्पती सूक्त, ज्ञानसूक्त आणि अन्नसूक्ताचा अभिषेक, महाआरती, “मंगलमूर्ते विघ्नहरा दूरित नाशना कृपा”चा जप आणिदर्शनासाठी भाविकांची गर्दी अशा चैतन्यमय वातावरणात वेदभवनात आज दुपारी बारा वाजता श्री गणेशाचा जन्म झाला.वेदासाठी जीवन समर्पित करणारे वेदमहर्षि कै, विनायकभट्ट घैसास गुरूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता नुकतीच वेदभवनात झाली. त्यानिमित्ताने वेदांचे घनपारायण, धार्मिक, बौद्धीक, सांस्कृतिक असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमिवर यंदाचा माघ शुद्ध चतुर्थीचा श्री गणेश जन्म सोहळा उत्साहात झाला.
वेदभवनातील श्री गणेश पदमासनात असल्याने त्याला “वेदपदम गणेश” असे म्हटले जाते. गणेशजयंतीच्या निमित्ताने काल वेदभवनातील गणेश मंदिरात गणेश याग वेदभवनातील विद्यार्थ्यांनी केला. लकुंद गणेश चतुर्थीची वेदभवनातील आजची सकाळ सनईच्या मंगलमय सूरांनी झाली. ऋग्वेदातील ब्रह्मस्पती सूक्ताचा मंडलाभिषेक करण्यात आला. या सूक्तात ६४ रूचा असून त्याची ४४४ आवर्तने म्हणजे मंडलाभिषेक होय. याशिवाय ज्ञानसूक्त, अन्नसूक्त आणि अथर्वशीर्षाचा अभिषेक करण्यात आला. वेदभवनचे प्रधान आचार्य मोरेश्वर घैसास गुरूजीनी महापूजा करून गणेश जन्म सोहळ्याचा प्रारंभ केला. यावेळी आचार्यांबरोबर विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष, शंकराचार्यरचित मुदकरात स्तोस्त्र पठण केले. त्यानतंर सर्वांनी “स्वानंदकेशा ब्रह्मगणेशा गजानना आदी, मानसपूजा सावधचित्ते करीतो ती घ्यावी” अशी गणेशाची मानसपूजा केली. श्री मोरया गोसावी यांनी लिहिलेल्या गणेशाच्या “श्री देव देव गणनायक सुख सौख्यदाता” या अष्टोत्तरशत नामस्तोस्त्रांनी गणेशावर गुलाल उधळण्यात आला. त्यानंतर सर्वांनी पाळणा म्हटला. शेवटी गणपतीची आणि त्याची पत्नी शारदेची आरती म्हणण्यात आली. आरतीनंतर निरंजनदास रचित “पिता माता बंधू तुजवीण असे कोण मजला, बहू मी अन्यायी परी सकलही लाज तुजला, न जाणे मी काही जपतप पूजा साधन रिती, कृपा दृष्टी पाहे शरण आलो तुज गणपती” अशी भाविकांसह सर्वांनी प्रार्थना केली.श्री गणेश जन्म सोहळ्यानंतर कृष्ण यजुर्वेदाचे घनपारायण झाले. वाराणसी येथील वेदमूर्ती नारायण घनपाठी, जगदीशन,एन. हरिहरन आणि सुंदरराजन आदी वेदमूर्तीं गेले काही दिवस वेदभवनात कृष्ण यजुर्वेद घनपारायणकरत असून त्याची सांगता पुढील आठवड्यात होणार आहे. हा सोहळा जरी असला तरी त्यात बाजारू डामडौल नव्हता की स्पीकर्सचा दणदणाट नव्हता. वेदमंत्र आणि गणेशाचा अखंड जप यांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. भारलेले होते.
संध्याकाळनंतर दर्शनासाठी येणा-या भाविकांची गर्दी वाढली. असली तरी कुठेही आरडाओरडा, गर्दीचा कोलाहल नव्हता. भाविक शांतचित्ताने दर्शन घेत होते. आलेल्या सर्व भाविकांना वेदभवनच्यावतीने प्रसाद देण्यात आला.