पुणे –आपल्या देशात एकाद्या व्यक्तीला संपवायचे असेल तर त्याचे पुतळे उभारण्याचे काम केले जाते मग पुतळे कुठेही समुद्रात उभारा किंवा गडावर उभारा, असे पुतळे बांधून वारसे निर्माण होत नाहीत.महात्मा गांधी यांनीच १९२३ साली लिहून ठेवले आहे की त्याग केल्याशिवाय पूजा होत नसते. त्यांनीच पुढे म्हटल्याप्रमाणे तत्वहिन राजनिती, श्रमविण संपत्ती, विवेक विना उपभोग घेणे, शील, चारित्र्य विणा ज्ञान. अनितीने केलेला व्यापार आणि मानवरिहत विज्ञान हे समाजाला घातक आहे. याच गोष्टींचा आपण अंगिकार जास्त प्रमाणात करतअसल्याने नैतिकतेचा –हास होत चाललेला दिसतो आणि याचेही आव्हान ज्ञानापुढे आहे.तंत्रज्ञत्रानामुळे वेगाने बदलणा-या ज्ञानयुगात विकासासाठी दरवर्षी देशाचा अर्थसंकल्प मांडण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे देशातील तरूण पिढीला स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी दरवर्षी देशाचा ज्ञानसंकल्प
मांडण्याची गरज काळानुरूप निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारनेच आता दरवर्षी देशाचा ज्ञानसंकल्पही सादर केलाच पाहिजे असे ठाम प्रतिपादन झी चोवीस तासचे संपादक उदय निरगुडकर यांनी आज येथे व्यक्त केले.
वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरूजी जन्मशताब्दी वर्षांच्या सांगता समारंभाराचा शुभारंभ आज वेदभवन येथे ज्ञानसत्राने झाले. या ज्ञानसत्रातील “ज्ञानयुग काल, आज आणि उद्या” या विषयावरील पहिले पुष्प गुफताना उदय
निरगुडकर बोलत होते. यावेळी वेदभवनचे प्रधान विश्वस्त मोरेश्वर घैसास व्यासपीठावर उपस्थित होते. सकाळी वेदभवनच्या प्रांगणात सिंम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष पदमविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते वेदध्वजारोहण झाले. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेदघोषात पाहुण्यांनी वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरूजींच्या प्रतिमेचे आणि वेद ग्रंथांचे पूजन केले. यावेळी वेदभवनचे कार्याध्यक्ष डॉ. उदय वारूंजीकर, माजी मंत्री शशीकांत सुतार आणि या सांगता समारंभाचे यजमान पद स्वीकारलेले शारंगधर फार्मासिटिकल्सचे डॉ. जयंत अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उदय निरगुडकर म्हणाले, अर्थसंकल्पातील वित्तीय तूट म्हणजेच ज्ञानसंकल्पातील अज्ञानाचा अंध:कार होय. ही अंध:कार दूर करण्याचा आव्हान पेलण्यासाठी राष्ट्रीय सकल उत्पादनाप्रमाणेच राष्ट्रीय सकल ज्ञानाचे मोजमापन आणि विश्लेषण करून त्यातील त्रुटी दूर कऱण्याची गरज आहे. आपल्या देशाला चैतन्यस्वरूप वेदांची परंपरा आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेले ज्ञान आपण समाजात किती दूरवर पोचवू शकलो याचे परिक्षण म्हणून दरवर्षी सरकारनेच ज्ञानसंकल्प सादर करण्याची गरज आहे. रेडिओचा शोध लागल्यानंतर तो पाच कोटी लोकांपर्यंत पोचण्यासाठी ३८ वर्षाचा कालावधी लागला. युक्रेनच्या साध्या कामागाराने शोधलेले व्टीटर तेवढ्याच लोकांपर्यंत पाच महिन्यात पोचले. इतक्या प्रचंड वेगाने वाटचाल सुरू आहे.
आपल्या देशात ज्ञानाचा प्रसार नीट न झाल्यामुळे आज समाजात विषमता आणि असंतोष वाढताना दिसत आहे असे सांगून ते म्हणाले, हा असंतोष आणि विषमता कमी करण्यासाठी ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी शिक्षण, महिला
सक्षमीकरण म्हणजेच मातृशक्तीची पुर्नस्थापना करणे, मानव विकास, पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि ज्ञानाधारित समाजाची निर्मिती या मुद्दांवर विशेषत्वाने भर देऊन त्यात काम केल्यास समाजातील शेवटच्या माणसाला सक्षम करण्याचे आव्हान पेलणे सहज शक्य होईल. त्यात मुलांच्या संकल्पनांना सुविधा द्याव्या लागतील.माहित नसलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी या आपल्या संस्कृतीचा विसरपडून आपण चंगळवाद आणि ओरबाडण्याच्या वृत्तीमुळे ओव्हर शूट डेचे संकट आपणच तयार करत आहोत. समाजात ज्ञानाची लालसा निर्माण करण्यास कमी पडत आहोत. तरूणांच्यातील शल्यकौशल्या विकसित केली नाहीत, शिक्षणाकडे दुर्लक्ष करून आपण ज्ञान निर्मिती ज्ञानप्रदान केंद्रांची दुरावस्था करून टाकली आहे. साठ टक्केशाळा आजही एकशिक्षिकी आहेत. अवघ्या दीड टक्के तरूण तांत्रिक शिक्षण घेत आहेत. असलेल्या शिक्षण पद्धतीतून अनुत्पादक फौजां निर्माण होत असल्याने असंतोष वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आयटी म्हणजे इंडियाज टुमारो असावा असे वाटत असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ऐहिकसुखाचा त्याग केल्याशिवाय ज्ञानाचा मार्ग सापडणार नाही. जगात पाच प्रकारच्या व्यक्ती असतात. ज्यात त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त आणि मस्त. यातील मस्त व्यक्ती या काही नाही काही चांगले करण्याचा प्रयत्न करत असतात, अडचणींवर मात करण्यासाठी संघर्ष करत असतात. त्यांची संख्या फक्त पाच टक्के असतेच आणि याच पाच टक्यांवर देश चालत असतो. आपल्या देशातील कल्पना दारिद्र्य ते वैचारिक श्रीमंती अशी मोठी दरी असून ती कमी करण्यासाठी ज्ञानाचे भांडार असलेल्या पुस्तकांनी घरातील कपाट भरा असा सल्लाही निरगुडकर यांनी शेवटी पालकांना दिला.
प्रास्ताविकात मोरेश्वर घैसास यांनीही आपल्याकडच्या पारंपारिक ज्ञान कसे उपयोगी पडते याबद्दलचा त्यांचा अनुभव कथन केला. ते म्हणाले, सन १९८६ साली आज उभ्या असलेल्या वेदभवनच्या जागेत कुठेही पाणी नाही असे त्यावेळीअनेक नामवंत तज्ञांनी आम्हाला त्यावेळी सांगितले होते. आपल्याकडे पायाळू असलेल्या व्यक्तींना भूमीगत पाण्याच्या प्रवाहाचे ज्ञान असले असे सांगितले आहे. त्यानुसार आम्ही पं. भीमसेन जोशींचे पायाळू असूनही पुढे याच विषयातील अधिक ज्ञान संपादन केलेले चिंरजीव राघवेंद्र जोशी यांना पाचारण केले. त्यांनी हातात तार घेऊन या जागेवर फेरफटका मारला. शेवटी एक पाराशी ते थांबले आणि इथे आपण प्रयत्न करू पाणी लागण्याची शक्यता आहे असे सांगितले. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी बोअर घेण्यास सुरूवात करताच पंधऱा फूटांवर पाणी लागले आहे. मात्र गेल्या काही वर्षात आजूबाजूला झालेल्या सर्व इमारतींसाठी तीनशे फूट खोल बोअर घेऊनही एकाही इमारतील पाणी लागलेले नाही ही वस्तूस्थिती कथन केली. तसेच वेदांचा प्रसाद म्हणून शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन निरगुडकर यांचा सत्कारही केला.
संध्याकाळच्या सत्रात इंदोरच्या कल्पना झोकरकर यांचा शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला.