पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त यंदा औंध रोड, बोपोडी मधील नागरिकांसाठी पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे, भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने व भाजप शिवाजीनगर सरचिटणीस तथा माजी नगरसेवक आनंद छाजेड यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती देताना पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे म्हणाले, कोरोनामुळे गेली दोन वर्षे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र आता कोरोना संकट कमी झाल्याने १४ एप्रिल रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंती निमित्त औंध रोड, बोपोडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत. जयंती निमित्त १७ एप्रिल रोजी प्रभागातील नागरिकांसाठी ‘पुणे मेट्रो सफर’ तर १२ एप्रिल रोजी सायंकाळी प्रभागातील विवाहित जोडप्यांचा सत्कार तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सुनील माने म्हणाले, जयंती निमित्ताने औंध रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बोपोडी येथील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ हे महानाट्य तसेच ‘नंदेश उमप रजनी’ हा कार्यक्रम या वर्षीचे खास आकर्षण असणार आहे. रविवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता बोपोडी येथील छत्रपती शिवाजी उद्यानासमोर ‘भिमा तुझ्या जन्मामुळे’ तसेच दि ११ रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित केलेला ‘नंदेश उमप रजनी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भिमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्यामधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग प्रेक्षकांसमोर सादर केले जाणार आहेत. तर नंदेश उमप रजनी या कार्यक्रमाद्वारे पार्श्वगायक, लोकशाहीर नंदेश उमप भिमगीतांसोबत मराठी व हिंदी चित्रपटगीते सादर करणार आहेत.
आनंद छाजेड यांनी ९ एप्रिल रोजी बोपोडी येथील डॉ.राजेंद्र प्रसाद शाळेत मोफत नेत्ररोग चिकित्सा व मोतीबिंदू शिबीर आयोजित केले आहे. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ३९ औंध रोड येथे बालमेळाव्याचे आयोजन केले आहे. १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत बोपोडी येथील डॉ.राजेंद्र प्रसाद शाळेत मोफत आधारकार्ड शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी नवीन आधारकार्ड काढणे, आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, आधारकार्ड वरील फोटो दुरुस्ती करणे आदि सुविधा उपलब्ध असणार आहे. या शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही छाजेड यांनी यावेळी केले.

