कॅटलिस्ट फाऊंडेशनतर्फे संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम
पुणे ता. २६ : “नागरिकांवर अन्याय अत्याचार होऊ द्यायचे नसतील तर त्यांना संविधानाने दिलेले अधिकार माहीत व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येकाला संविधानानुसार कर्तव्याची जाणीव ठेवायलाच पाहिजे. यासाठी संविधान दिनाचा जागर घरोघरी झाला पाहिजे, असे मत संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे यांनी येथे व्यक्त केले.
कॅटलिस्ट फाऊंडेशन व भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने, पीएमपीएलचे अध्यक्ष प्रकाश ढोरे यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त ई. झेड खोब्रागडे यांचे ऑनलाइन व्याख्यान घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
खोब्रागडे म्हणाले, “संविधानाने देशातील विषमता संपुष्टात आणली. तसेच प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार प्रदान केले. आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या या संविधानाचे महत्व लहान वयातच मुलांमध्ये रुजावे, या उद्देशाने मी २००५ पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत संविधान प्रास्ताविका वाचनाचा उपक्रम सुरू केला. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना संविधान प्रास्ताविका शाळेच्या पुस्तकात छापण्याची कल्पना सुचवली. २००८ मध्ये राज्यात संविधान दिनाचा कार्यक्रम सुरू झाला. नागपूरमधील आरबीआय चौकाला नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे संविधान चौक नाव देण्यात आले. नंतर येथे संविधान प्रास्ताविका लावण्यात आली. देशातील हा पहिला संविधान चौक आहे. मात्र २००८ नंतर राज्याने हा कार्यक्रम व्यवस्थित सुरू ठेवला नाही, हे खेदाने म्हणावे लागेल.
ते पुढे म्हणाले की, केवळ हा एक विशेष दिवस म्हणून साजरा होता कामा नये. याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी गावागावात संविधान साहित्य संमेलन, पुस्तक मेळावे, निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या पाहिजे. ज्यायोगे उस्फूर्तपणे नागरिक यात सहभागी होतील, लेखन करतील, मुक्तपणे चर्चा करतील. परिणामी, या संविधानास अपेक्षित असणारा उल्लेखनीय व आशादायी बदल समाजात घडण्यास आरंभ होईल.
आजचे औचित्य साधून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत दिवसाचा शुभारंभ केला. माझ्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना असून हा एक सकारात्मकतेकडे नेणारा बदल आहे, असेही खोब्रागडे यांनीआवर्जून नमूद केले. ऑनलाइन माध्यमातून सहभागी झालेल्या नागरिकांसाठी खोब्रागडे यांचे व्याख्यान मार्गदर्शनपर व प्रेरणादायी ठरले.
संविधान प्रास्ताविका,
पुस्तकांचे वाटप
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सुनील माने तसेच पीएमपीएलचे अध्यक्ष प्रकाश ढोरे यांच्या वतीने औंध रोड, बोपोडी येथील नागरिक, सोसायट्या, विविध धार्मिक स्थळे, तसेच विविध तरुण मंडळे यांना संविधान प्रस्ताविका व संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

