‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते मंगल कलश प्रदान
‘वनराई’च्या पुढाकाराने आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व
‘झी-24 तास’ यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार्या ‘जलसंवर्धन
पंचायत- एक लोकचळवळ’ या मोहिमेचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते झाला. शुभारंभाचे प्रतिक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांना मंगल कलश प्रदान
करण्यात आला. ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र
शासनाचा पर्यावरण विभाग’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’,
यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यामध्ये दि. 7 जून, 2016 रोजी
‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई’ येथे हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम,
पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्री.
स्वाधीन क्षत्रिय तसेच ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे सचिव डॉ. पी.
अनबलगन व ‘झी-24 तास’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते.
‘‘जल संवर्धनाच्या कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी ही मोहीम अतिशय
मार्गदर्शक ठरेल,’’ असा विश्वास मा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
या मोहिमेच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभागी असलेल्या
महाराष्ट्रातील विशेषतः बीड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना, उस्मानाबाद,
वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा,
सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमधील ‘वनराई’चे सुमारे250 कार्यकर्ते व
ग्रामस्थ या सोहळ्याला उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा,
यासाठी वनराईचे मुख्य प्रकल्प संचालक श्री. जयवंत देशमुख यांनी विशेष
मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भातील माहिती ‘महाराष्ट्र प्रदूषण
नियंत्रण मंडळा’चे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी या सोहळ्याच्या
प्रास्ताविकातून दिली. प्रत्येक गावातच जल संवर्धनाच्या उद्दिष्टाने प्रेरित
तरुण पिढी निर्माण झाली, तर दुष्काळग्रस्त गावांचे चित्र बदलायला वेळ
लागणार नाही. या तरुण पिढीच्या पुढाकारातून पाण्याचे मोजमाप,
नियोजन, व्यवस्थापन व संवर्धन करणारी व्यवस्था गावपातळीवर उभी
करता येईल. याशिवाय मृदा संवर्धन, गवताळ कुरणे व वृक्षलागवडीच्या
कार्यक्रमांनाही चालना देता येईल, तसेच कमी पाण्यात येणारी पिके घेण्यास
आणि सूक्ष्म सिंचनाच्या वापरास शेतकर्यांना प्रवृत्त करता येईल. दुष्काळ
निर्मूलनाचा हा विकेंद्रित आणि एकात्मिक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून
गावोगावच्या तरुण पिढीला सक्रिय करण्यासाठी ‘वनराई’, ‘महाराष्ट्र प्रदूषण
नियंत्रण मंडळ’ आणि ‘झी-24 तास’ यांच्या संयुक्त सहकार्याने ‘जलसंवर्धन
पंचायत – एक लोकचळवळ’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या
अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातील 100 गावांपासून करण्यात येत असून,
दरवर्षी टप्प्या-टप्प्याने याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या
उपलब्धतेबरोबरच पाणी टंचाईच्या समस्येचे निवारण होईल, तसेच भूजल
पातळीत आणि शेतीच्या उत्पादनातही वाढ होईल. पडीक जमिनी
उत्पादनक्षम होतील. जनावरांना चारा-पाणी उपलब्ध होईल. पर्यावरणाचा
समतोल राखला जाईल. रोजगाराच्या संधी निर्माण होऊन शेतकर्यांच्या
आत्महत्या आणि शहराकडील स्थलांतराला आळा बसेल,’’ असा विश्वास
‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त
केला, तसेच या मोहिमेला खर्या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त
करून देण्यासाठी सर्वांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही
त्यांनी यावेळी केले.