नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या जमीन सर्वेक्षणाचे जगातील पहिले प्रमाणक स्थापित करण्याचा प्रयत्न करत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सीओई-एसयूआरव्हीईआय अर्थात उपग्रह आणि मानवविरहित दूरस्थ वाहन उपक्रमविषयक उत्कृष्टता केंद्राने ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हाती आलेल्या प्रतिमांचा दर्जा निश्चित करण्यासाठी संदर्भ प्रमाणके म्हणून उपयुक्त ठरू शकतील अशा तांत्रिक मानकांचे वर्णन करणारा संकल्पना मसुदा प्रसिद्ध केला आहे.
या संदर्भात ड्रोनच्या वापरातून जमिनीच्या सर्वेक्षणासाठी मिळविलेल्या प्रतिमांच्या दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी एकसमान मानके निश्चित करण्याच्या दृष्टीने सीओई-एसयूआरव्हीईआयने सर्व भागधारकांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत.
सध्याच्या काळात, जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करून मिळविलेल्या प्रतिमांच्या मूल्यमापनासाठी कोणतीही प्रमाणित मानके निश्चित करण्यात आलेली नाहीत, हे लक्षात घेणे सयुक्तिक ठरेल. त्यामुळे ड्रोनकडून मिळविलेल्या प्रतिमांची पश्चात-प्रक्रिया करणे आव्हानात्मक झाले आहे. या कारणाने ड्रोनने दिलेल्या प्रतिमांच्या माहितीवरून कृत्रिम बुद्धीमत्ता तसेच मशीन लर्निंग साधनांचा वापर करून संबंधित माहिती मिळविण्याला मर्यादा येतात.
सीओई-एसयूआरव्हीईआयने त्यांच्या माहितीविषयक भागीदारांच्या सहकार्याने ड्रोनद्वारे केलेल्या सर्वेक्षांच्या निकालासाठी प्रमाणक मसुदा विकसित करण्यात पुढाकार घेतला असून ड्रोनशी संबंधित समुदाय आणि इतर भागधारकांकडून सूचना आणि अधिक विस्तृत सल्ला मिळविण्याच्या दृष्टीने हा मसुदा प्रसिद्ध केला आहे.
ड्रोनकडून मिळालेल्या माहितीच्या दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी या प्रमाणक मसुद्यात नमुन्याच्या बेंचमार्किंगशिवाय प्रतिमेचा दर्जा ठरविण्यासाठी 19 विविध मानक क्षेत्रे तसेच 8 विस्तारित मेट्रिक्स/तंत्रांचा समावेश करण्यात आला आहे.