नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत दोन्ही कंपन्यांच्या लसी १५० रुपये प्रतिडोस दराने खरेदी केल्या आहेत.आता मात्र लसी महाग झाल्या आहेत ,यात कोविशील्ड २०५ आणि कोव्हॅक्सिन २१५ (विनाकर) रुपयांना मिळेल. करांसह कोविशील्डच्या एका डोसची किंमत २१५.२५ रुपये तर कोव्हॅक्सिन २२५.७५ रुपये आहे.यानुसारच आता केंद्र सरकारने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे ६६ कोटींहून अधिक डोस खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. आजवर सरकारची ही सर्वात मोठी ऑर्डर असून हे डोस याच वर्षी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सरकारला मिळतील. महत्त्वाची बाब म्हणजे हे डोस सुधारित दराने खरेदी केले जातील. नवीन ऑर्डर दिल्याने लस तुटवड्याची तक्रार करणाऱ्या राज्यांना दिलासा मिळणार आहे.
फटका तब्बल ४,६०५ कोटीचा
सरकारने १७ जुलैपर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दोन्ही लसींचे ४१.६९ कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत. तर २.७४ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. नवीन ऑर्डरनुसार सरकारने कोविशील्डच्या ३७.५ कोटी डोससाठी ८,०७१ कोटी आणि कोव्हॅक्सिनच्या २८.५ कोटी डोससाठी ६,४३३ कोटी रुपये दिले. जर जुन्या दराने हे डोस दिले गेले असते तर ही रक्कम ९,९०० कोटी रुपये झाली असती. केंद्र सरकारला ४,६०५ कोटी जास्तीचे द्यावे लागले आहेत.

