मुंबई- ‘केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल,’ अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे पुढे म्हणाले की, ‘केंद्र सरकार आपल्याला लस पुरवले, अशी मला खात्री आहे. जी कामे राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतच आहोत. लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार केले आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरु होईल, असेही राजेश टोपे म्हणाले.
मायक्रो प्लॅनिंग सुरू
टोपे पुढे म्हणाले की, ‘लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक, शिवाय इतर आजार असलेले 50 वर्षाखालील असा सगळा डेटा तयार करत आहोत. 18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचे काम आता पूर्ण होईल. कसीच्या स्टोरेजसाठी कोल्डचेनची व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायचे आहे, त्या व्यक्तीला मेसेज मिळेल, तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार. अशाप्रकारची मायक्रो प्लॅनिंग सुरू’ असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

