नवी दिल्ली- कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार कोराना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्याच्या तयारीत आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, 1 मे पासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
येत्या काळात कमी दिवसांत देशात सर्वाधिक वेगात लसीकरणाचे ध्येय पूर्ण करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. जगभरातील मोठे लसीकरण राबविण्याचा पंतप्रधानांचा मानस असून यासाठी वयाची मर्यादा, लसीची किंमत, प्रशासकीय तयारी या सगळ्यांच लवचिकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच लसीकरणारासाठी परदेशातील लसींचाही आगामी काळात वापर वाढताना दिसेल. लस उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना, ते ज्या राज्यात लस उत्पादित करत आहेत, त्या सरकारला उत्पादनाच्या ५० टक्के लशी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली असून, या लसी आता बाजारातही ठरलेल्या किमतीला दुकानांत उपलब्ध होतील. राज्य सराकरांना लसीचा तुटवडा भासत असेल तर त्यांना उत्पादकांकडून लस घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच १८ वर्षांवरील कुणीही ही लस आता घेऊ शकणार आहे.
देशातील कोरोनाची दुसऱ्या टप्प्याची परिस्थिती गंभीर होत असल्याने, केंद्र सरकारने तातडीने याबाबत पावाले उचलत लसीकरणाचा वेग वाढवला आहे. महाराष्ट्रात लसी कमी मिळत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती, याबाबत पंतप्रधानांना राज्य सरकारने पत्रही पाठवले होते. त्यानंतर हाफकिन संस्थेला लस उत्पादित करण्याची मान्यताही देण्यात आली होती. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी पंतप्रधानांनी मोठा निर्णय घेतला आहे.
१६ जानेवारी २०२१ ला सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात आली, त्यानंतर १ मार्च २०२१ पासून वय वर्षे ४५ वरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.