नवी दिल्ली-देशात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यात ६० वर्षांवरील सुमारे १० कोटी ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयांत मोफत लस दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांत लसीचा एक डोस घेण्यासाठी २५० रुपये द्यावे लागतील. म्हणजेच, दोन डोससाठी ५०० रुपये खर्च येईल.
एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा म्हणाले, खासगी रुग्णालयांत प्रत्येक डोसमागे १०० रुपये सेवा शुल्क आणि १५० रुपये लसीसाठी घेतले जातील. सरकार एक डोस १५० रुपयांना देत आहे. नोंदणीसाठी कोविन-२.० अॅप रविवारी किंवा सोमवारी लाँच होईल. यानतंर लाभार्थी नोंदणी करू शकतील.
गंभीर आजारांत कॅन्सरसारख्या रोगांचा समावेश : ४५ वर्षांवरील लोकांना लसीकरणासाठी २० गंभीर आजारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मधुमेह, हायपरटेन्शन, लिव्हर, किडनी, हृदयविकार, बायपास सर्जरी, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर, ल्युकेमिया, कमी प्रतिकारशक्ती, कॅन्सर, सिकलसेल अॅनिमिया, थॅलेसेमिया, एचआयव्हीसारख्या रोगांचा समावेश आहे. विविध उपचारांत दिव्यांग झालेल्यांनाही लसीचा डोस देता येऊ शकेल.
विदर्भातून परभणीत येणाऱ्या वाहतुकीस ७ मार्चपर्यंत प्रतिबंध
परभणी | विदर्भातून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या व परभणी जिल्ह्यातून विदर्भातील जिल्ह्यात जाणाऱ्या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस ७ मार्चपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.
अमरावतीत ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन
अमरावतीत गेल्या ६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र कोरोना आटोक्यात येत नसल्यामुळे प्रशासनाने ८ मार्चला सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.
विदर्भात शनिवारी २९०५ नवे रुग्ण, तर २४ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात १०, वर्ध्यात १, अमरावती ८, अकोला ३ आणि यवतमाळ जिल्ह्यात दोन मृत्यू झाले. विदर्भातील रुग्णसंख्या ३ लाख १७,३२८ तर बळींचा आकडा ७३२६ झाला आहे. आतापर्यंत २ लाख ८७,०९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. रिकव्हरी रेट ९०.४७% आहे.
महाराष्ट्रासह सहा राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली
कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह सहा राज्यांत वाढत असून पुण्यात गेल्या ८ दिवसांत १ हजार नवे रुग्ण आढळले. विदर्भातील पाच जिल्ह्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात शनिवारी एकूण ८,३३३ रुग्ण आढळले. त्यामुळे हा नवा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोविन-२.० ॲपवर ऑनलाइन, सेवा केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येईल
नोंदणीसाठी कोणते पर्याय आहेत?
कोविन (Co-Win 2.0) ॲप आणि वेब पोर्टल cowin.gov.in वर नोंदणी करता येईल. आरोग्य सेतू ॲपही याला जोडण्यात आला आहे. कॉमन सेंटर आणि सेवा केंद्रांवर जाऊनही नोंदणी करता येईल. ६ लाख गावांत सुमारे २.५ लाख केंद्र आहेत. आशा कार्यकर्त्या नोंदणी करतील.
ॲपवर नोंदणी कशी होईल?
मोबाइलमध्ये ॲप डाऊनलाेड करा. ॲपमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करून नोंदणी करावी. फोटो आयडी आवश्यक. कोणत्या दिवशी कोणत्या केंद्रावर लस घ्यावयाची आहे, हे निवडता येईल. याचा एसएमएस संबंधितांना पाठवला जाईल.
किती केंद्रांवर लस मिळेल?
ॲपवर आपण जवळील केंद्राची निवड करू शकाल. सर्व सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रांशिवाय आयुष्मान भारतशी संबंधित ११ हजार रुग्णालये किंवा कंेद्रीय सरकारी आरोग्य योजना रुग्णालये (सीजीएचएस) लस घेण्यासाठी निवडता येतील. ज्या राज्यांत आयुष्मान योजना लागू नाही अशी राज्ये खासगी रुग्णालये निश्चित करतील. स्टेट हेल्थ इन्शुरन्स योजनेत नोंदणीकृत रुग्णालयांतही लस घेता येणार आहे.
एका फोनवर किती नोंदणी होऊ शकेल?
नोंदणीसाठी तुम्ही तुमचा किंवा इतर कुणाचाही मोबाइल वापरू शकाल. एका मोबाइल फोनवरून १ ते ४ जणांची नोंदणी करता येणार आहे.
नोंदणी नसताना लस घेता येऊ शकेल?
होय… रेल्वेत जसे रिझर्व्हेशन नसताना सीट दिले जाते तसे लसीकरण केंद्रावर जाऊन डोस घेता येईल. मात्र, हा निर्णय संबंधित राज्ये घेतील. त्या-त्या केंद्रांची क्षमता आणि ऑनलाइन-ऑफलाइन नोंदणीचे प्रमाणही ही राज्ये ठरवू शकतील.
डोस घेताना पडताळणी कशी होईल?
ज्या लोकांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे त्यांना आयडी कार्ड ठेवावे लागेल. ४५ वर्षांवरील लोकांना नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. यात संबंधित आजाराची संपूर्ण माहिती असेल.
कोणती लस घ्यायची हे पण ठरवू शकाल?
देशात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी मिळाली आहे. अॅपवर नोंदणी करताना लसीच्या नावाबाबत माहिती मिळणार नाही. मात्र, लस घेताना तुम्हाला कोणती लस दिली जात आहे हे सांगितले जाईल. प्रत्येक केंद्रावर एका कंपनीची लस असेल. तुम्ही ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे तिथे उपलब्ध लस तुम्हाला नको असेल तर दुसऱ्यांदा नोंदणी करून तुम्ही केंद्र बदलू शकाल.
लस घेतल्यावर सावधगिरी बाळगावी?
पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा घेता येईल. यानंतर १४ दिवसांनी प्रतिकारक्षमता विकसित होईल. मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा.

